सचिन अंदुरेच्या पत्नीचा दावा

सचिन प्रकाशराव अंदुरे आणि शरद कळसकर यांचा परस्पर परिचय असल्याचा दावा करत दहशतवाद पथकाने केलेली अटकेची कारवाई चुकीची ठरवत सचिनची पत्नी शीतल हिने कळसकरशी आपल्या पतीची ओळख नव्हती, असा दावा केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनात सहभागी असल्याचा आरोप असणाऱ्या सचिनला या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोपही तिने केला आहे.

औरंगपुरा भागातील उंच पिंपळाच्या झाडाच्या शेजारी लहानसे केशकर्तनालय. रविवार असूनही गर्दी अगदीच कमी. दुकानातूनच घराकडे जाणारा एक बोळ ओलांडल्यावर पत्र्याच्या खोलीत नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरेची पत्नी पाच महिन्यांच्या मुलीला घेऊ न बसलेली. दीड-दोन फुटांच्या बोळातून गेल्यावर शीतलची भेट झाली. ‘शीतल धक्क्य़ात आहे, ती बोलण्यास तयार होणार नाही,’ असे तिचे वडील सूर्यकांत सुरळे सांगत होते. मात्र, नंतर तिने सचिनच्या अटकेचा घटनाक्रम पत्रकारांना सांगितला.

दहशतवादविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट रोजी फोन करून सचिनला क्रांती चौक पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तेथून पथक राजाबाजार परिसरातील कुंवारफल्ली गल्लीतील भाडय़ाने राहत असलेल्या घरी पोहोचले. तेथे सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली. त्यात काहीही सापडले नाही. चौकशीसाठी म्हणून सचिनला व त्याचा मोठा भाऊ प्रवीणला मुंबईला घेऊन गेले. १६ ऑगस्ट रोजी पुन्हा औरंगपुऱ्यातील माझ्या माहेरी आणून सोडताच केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) एम. एस. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उचलले. आम्हाला सचिनच्या जीवाला धोका असल्याचे सांगून त्याला सोबत घेऊन जात असल्याचे पाटील म्हणाले. या वेळी सचिनचा आणि शरद कळसकर याचाही कसलाही संबंध नसल्याचा दावा शीतलने केला.

सचिन अंदुरे नेमका कोण याच्याविषयी औरंगाबादेत चर्चा सुरू आहे. त्याविषयी त्याचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी, ‘सचिन हा मूळचा औरंगाबाद येथीलच रहिवासी असून स. भु. महाविद्यालयातून तो वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर झालेला आहे. मागील आठ वर्षांपासून तो निराला बाजारमधील एका कपडय़ाच्या दुकानात अकाऊंटचे काम पाहत होता.