मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील सदनिकाधारकांना स्वत:हून सोसायटी स्थापन करण्याचे आवाहन करताना बिल्डरची त्यासाठी आवश्यकता नसल्याचे जाहीर केल्यानंतरही सहकार खात्यातील झारीतल्या शुक्राचार्यामुळे सोसायटीची नोंदणी करण्यात अनेक अडथळे निर्माण होत असल्याने पुण्यातील सदनिका धारक अडचणीत आले आहेत. वानवडीतील एका नियोजित सोसायटीला सहकार खात्याने अशाच वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.
वानवडीतील नियोजित कैलाश कुटीर सहकारी गृहरचना संस्था येथील ५६ सदनिकाधारक आणि सहा रोहाऊस धारकांना पाच वर्षीपूर्वी सदनिकेचा ताबा मिळाला असला तरी त्यांना अद्यापही बांधकाम व्यावसायिकामुळे गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्यासाठी झगडावे लागत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सोसायटी स्थापन करण्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या बाजूने निकाल लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही दिवसांनी सोसायटीचे पदाधिकारी उपनिबंधक कार्यालयात गेल्यानंतर, त्यांना बांधकाम व्यावसायिकाने कंडोमेनियम (अनेक इमारतीचा समूह) निर्माण करण्यासाठी अर्ज केल्याची माहिती  लिपिकाने दिली.
याबाबत नियोजित कैलाश कुटीर सहकारी गृहरचना संस्थेचे मुख्य प्रवर्तक रॉबर्ट लोबे यांनी सांगितले की, वानवडी येथील तात्या टोपे सोसायटी समोरील नवीन सोसायटीमधील ५६ सदनिका, तर सात रो-हाऊस एका बांधकाम व्यावसायिकाने बांधून दिले. या सदनिका व रो-हाऊसची विक्री करून त्याचा ताबा संबंधित सदनिकाधारकांना दिला. या सोसायटीमधील सर्वाची गृहनिर्माण सोसायटी तयार करावी, अशी सर्वाची मागणी आहे. बांधकाम व्यावसायिकाने ती तयार करून देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ती तयार करून न दिल्यामुळे सदनिकाधारकांनी जुलै २०१२ मध्ये बांधकाम व्यावसायिकाकडे गृहनिर्माण संस्था नोंदणी करून देण्याची मागणी केली. या सदनिकाधारकांनी नियोजित कैलाश कुटीर सहकारी गृहरचना संस्था मर्या. नावाची संस्था स्थापन केली. त्याची नोंदणी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाकडे २४ सप्टेंबर २०१२ ला अर्ज केला. त्यानुसार ३० नोव्हेंबर २०१२ रोजी नोंदणीचा प्रस्ताव उपनिबंधक यांच्यासमोर आला. हे प्रकरण जिल्हा उपनिबंधक किरण सोनवणे यांच्यासमोर सुनावणीसाठी आले. सदनिकाधारक व बांधकाम व्यावयायिक यांना आपले लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले.
उपनिबंधकासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्यासाठी सदनिकाधारकांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. मात्र, बांधकाम व्यावसायिक आपले म्हणणे सादर करू शकले नाहीत. त्या वेळी सदनिकाधारकांना जिल्हा उपनिबंधक सोनवणे यांच्याकडून तुमच्या बाजूने निर्णय झाल्याचे सांगितले. तुम्हाला पुढील गोष्टी कळविण्यात येतील, असेही सांगण्यात आले. एक-दोन वेळा गेल्यावर पुढील तारखेस बोलविण्यात आले. त्यानंतर पुन्हा गेल्यावर या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाने कंडोमेनियम तयार केले आहे. त्यामुळे आता काही होऊ शकत नसल्याचे येथील लिपिकाकडून सांगण्यात आले. या ठिकाणच्या ५६ सदनिकाधारक आणि सहा रोहाऊस धारकांची मागणी गृहनिर्माण सोसायटी करावी, अशीच आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय स्तरावर लढा देऊनही बांधकाम व्यावसायिकाच्या दबावामुळे त्याला यश आलेले नाही, असे लोगो यांनी सांगितले.