सदनिका व मालमत्ता विक्रीबाबत दोन कंपन्या सुरू करून या कंपन्यांच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणच्या सदनिकांची बोगस माहिती वेबसाईटवर  टाकून बुकिंगच्या नावाखाली नागरिकांची तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना सात एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अंकुश बबन वडे (वय २९, रा. चाकण, मूळ रा. मुंबई), योगेश रघुनाथ करंडे उर्फ युवराज राजाराम गडकरी उर्फ युसूफ मकलाई उर्फ राजा चव्हाण(वय ३१, रा. अ‍ॅमनोरा टाऊन सेंटर, हडपसर. मूळ रा. डेभेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), आकाश उर्फ विक्रांत उमेश पाटील (वय २२, रा. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात स्वरुप शर्मा उर्फ राज शुक्ला, रोहन पाटील, वैशाली कारंडे हे फरार झाले आहेत. ऑगस्ट २०१४ ते २० मार्च २०१५ या कालावधीत विमाननगर येथील ऑलमॅक्स रियालिटी एकर्स व लष्कर भागातील वेलीग्टन होमझोन इंडिया या कंपनीत हा प्रकार घडला.
आरोपींनी या दोन कंपन्या सुरू केल्या होत्या. सदनिका खरेदीच्या नावाखाली ग्राहकांना खेचण्यासाठी त्यांनी कंपन्यांच्या वेबसाईटही तयार केल्या होत्या. त्यावरील जाहिरातींमध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणच्या सदनिकांची छायाचित्रं देण्यात आली होती. बुकिंग करण्यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आले होते. त्यानुसार काही नागरिकांनी त्या क्रमांकावर संपर्क साधून व पैसे भरून सदनिकांची बुकिंगही केले. मात्र, सदनिका व पैसेही न देता नागरिकांची फसवणूक करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली.
वडे हा ऑलमॅक्स रियालिटी कंपनीचा संचालक आहे, तर चव्हाण हा वेलिंग्टन होमझोन कंपनीचा संचालक आहे. आरोपींकडून अपहार केलेली रक्कम जप्त करायची आहे. त्यांचे इतर साथीदारांचा शोध घ्यायचा आहे, याबाबत तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ए. के. पाचारणे यांनी केली. ही मागणी मान्य करीत न्यायालयाने तिघांची रवानगी पोलीस कोठडीत केली.