पुणे : दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाकडून कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

प्रक्रिया संघाची बैठक कात्रज येथे झाली. त्यानुसार संघाकडून ही मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मदतीचा धनादेश प्रदान केली. संघाचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर, चितळे दूधचे श्रीपाद चितळे, सोनाई दूधचे दशरथ माने, पराग मिल्क फुड्सचे संजय मिश्रा, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे या वेळी उपस्थित होते.

उद्यम सहकारी बँकेतर्फेही पूरग्रस्तांना निधी देण्यात आला.  बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला होता. बँकेच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार आणि संचालक मंडळातर्फे ७५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला. बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, संचालक दिलीप उंबरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे या कार्यक्रमात उपस्थित होते.