महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील आठवड्यामध्ये राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीसंदर्भात भाष्य करताना शहर नियोजन सदोष असल्याचं म्हटलं आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी शहरे भकास होत चालली आहेत असं म्हणत शहर नियोजनासंदर्भात व्यवस्थेला फार महत्व वाटत नसल्याबद्दल खंत व्यक्त केलीय.

पावसासंदर्भात ढिसाळ नियोजन आहे, असं सांगत राज यांनी पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहर नियोजन महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. “शहरे भकास होत चालली आहेत, काय, कसं असलं पाहिजे त्याचे नियोजन हवे, सरकार कोणतेही असो तीच परिस्थिती आहे. पावसाच्या संदर्भात ढिसाळ नियोजन आहे. रस्ते, पूल बांधणे यातच आपण गुंतलो आहे. शहर नियोजन हे काही रॉकेट सायन्स नाहीय. इंच इंच लढू असं होतं, आता इंच इंच विकू असं सुरु झालं आहे.” असं राज म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरेंनी मुंबईमधील परिस्थितीवर भाष्य केलं. “आमच्याकडे अशी काही ठिकाण आहेत की, चार दहा लोक मुतले तरी नदी भरते, अशी परिस्थिती आहे. तसेच जगात नियोजन होतं, तर मुंबईत महाराष्ट्रात का होऊ शकत नाही. प्लॉट फक्त बिल्डरच्या घशात घालायचे आहेत का?,” असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. राज यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शहर व्यवस्थापनाबद्दल आपली भूमिका मांडताना ब्लू प्रिंट सादर केलेली. त्यामध्ये त्यांनी शहर नियोजन कसं असावं आणि इमारती व मोकळ्या जागा याचा समतोल कसा साधावा यासंदर्भातही भाष्य केलं होतं.

राज्यातील लॉकडाउनसंदर्भातही व्यक्त केली नाराजी…

काही दिवसांपूर्वीच उपस्थित केलेला दोन लसी घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करु देण्याचा मुद्दा राज यांनी आज पुण्यामधील पत्रकारपरिषदेमध्ये पुन्हा उपस्थित केला. इतकचं नाही तर बाहेरच्या राज्यांमध्ये सगळं सुरु आहे तर महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न राज ठाकरेंनी पुण्यामधील पत्रकारपरिषदेमध्ये उपस्थित केलाय. लॉकडाउनसंदर्भात आता सरकारने आणखीन थोडी शिथिलता देण्याची गरज असल्याचं मत राज यांनी व्यक्त केलंय. लॉकडाउनमुळे लोकांचे उद्योग बंद झालेत, असं सांगतानाच यांना लॉकडाउन करायला काय जातंय?, असा टोलाही राज्य सरकारला राज यांनी लगावला आहे. एवढचं नाही तर लॉकडाउन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे का असा सवाल उपस्थित करत जर असं असेल तर कोणी प्रश्न विचारायलाच नकोत, असंही राज म्हणालेत.

माझ्या भूमिका स्पष्ट असतात…

भाजपासंदर्भात बोलताना राज यांनी आपल्या राजकीय भूमिका फार स्पष्ट असल्याचं सांगितलं. “माझं वैयक्तिक वैर कुणाशीही नाही. मला मोदींच्या, अमित शाहांच्या भूमिका पटत नाहीत. त्या नाही पटल्या तर मी तसं सांगतो. ज्या भूमिका पटल्या त्या पटल्या असंही मी सांगितलंय,” असंही राज म्हणाले.