महापालिका शिक्षण मंडळाकडून बेसुमार भावाने होणाऱ्या खरेदीबाबत तसेच त्यातील गैरप्रकारांबाबत सातत्याने चर्चा होत असतानाच आता मंडळाने केलेली कुंडय़ा व झाडांची खरेदीही वादात सापडली आहे. मंडळाने एक हजार रुपयाला एक याप्रमाणे कुंडय़ांची व रोपांची खरेदी केल्याचा प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत उघड करण्यात आल्यानंतर या खरेदीची चौकशी करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवींद्र धंगेकर यांनी स्थायी समितीत या संबंधीची तक्रार आयुक्तांकडे केली. शिक्षण मंडळाने एका पुरवठादाराकडून फायबरच्या छोटय़ा आकारातील कुंडय़ांची खरेदी केली असून प्रत्येक कुंडीत एक रोपही लावण्यात आले आहे. बाजारात या आकाराची कुंडी जास्तीतजास्त शंभर ते एकशेदहा रुपयांना मिळते. घाऊक खरेदी केल्यास त्यापेक्षा कमी दरात कुंडय़ा मिळू शकतात. या कुंडय़ाचा पुरवठा प्रत्येक शाळेत तीन या प्रमाणे सध्या केला जात आहे. कुंडी घेऊन आलेल्या माणसाकडे तीन कुंडय़ांचे तीन हजार रुपये देण्याबाबत सर्व शाळाप्रमुखांना/मुख्याध्यापकांना आदेश देण्यात आले असून कुंडय़ा शाळेत पोहोचताच शाळेच्या निधीतून हा धनादेश दिला जातो, असे धंगेकर यांनी स्थायी समितीमध्ये सांगितले.
या खरेदीची चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. शिक्षण मंडळाची प्रत्येक खरेदी अशाचप्रकारे होत असते आणि या खरेदीत अनेक गैरप्रकारही होत असतात. त्यातील ज्या प्रकारांची आतापर्यंत चौकशी झाली, त्यात जादा दराने वस्तू खरेदी केल्याचेही वेळोवेळी उघड झाले आहे. त्यामुळे मंडळाच्या खरेदीबाबत चौकशीची आवश्यकता असून बाजारात मिळणाऱ्या कुंडय़ा व रोपांची खरेदी सात ते आठपट जादा दराने होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मंडळाकडून याबाबत खुलासा मागवावा व चौकशी करावी अशीही मागणी धंगेकर यांनी या वेळी केली. त्यानंतर त्यांच्या मागणीची दखल घेऊन मंडळाने केलेल्या या खरेदीची चौकशी करण्याचे आश्वासन स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी दिले.