News Flash

बाजारभेट : फुलांच्या बाजारपेठेचा व्यावहारिक गंध!

फुलबाजाराची रोजची उलाढाल सरासरी ३० ते ४० लाखापर्यंत होते.

मानवी जीवनाशी आणि एकूणच त्याच्या भावभावनांशी, फुलांचे नाते हे उत्क्रांती काळापासूनच जडलेले आहे. रानावनात राहणारे आदिवासीदेखील त्यांच्या देवतांसाठी, तसेच नृत्य गायनाच्या वेळी फुलांच्या माळा तयार करतानाचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. मानवाने कितीही प्रगती केली तरी त्याच्या संस्कृतीमध्ये फुलांचे महत्त्व कालातीत असेच राहिले आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासामध्ये, सुख-दु:खाच्या प्रत्येक क्षणी, व्यक्त होण्यासाठी, मानवाला फुलांची साथ नेहमीच मोलाची वाटत आली आहे. प्रस्तुत लेखामध्ये मुख्यत्वे फुलांच्या व्यावहारिक विश्वाची, पुण्यातील बाजारपेठेची संक्षिप्त माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

नदीकाठी वसलेल्या पुण्यनगरीचा जसा विकास होत गेला तसतशी फळे, फुले, भाजीपाल्याची बाजारपेठसुद्धा स्थलांतरित होत गेली. कसब्यातील जुन्या काळभैरवनाथाचे मंदिर, शनिवारवाडा, मध्यवस्तीतील फुले मंडई आणि १९७८ साली मार्केट यार्ड परिसरात ही बाजारपेठ स्थलांतरित झाली. फुलांचा बाजार १९९० साली येथे आला. त्यापूर्वी हा बाजार बाबूगेनू चौक आणि फुलवाला चौक परिसरात विखुरलेला होता. सद्य:स्थितीत मार्केट यार्ड येथे घाऊक बाजारात १३१ अधिकृत गाळेधारक असून, इतर नोंदणी नसलेल्या व्यावसायिकांची संख्या पन्नासपेक्षा अधिक आहे. येथील आडते मंडळींचे गाळे १०० स्क्वे.फूटपासून १००० स्क्वे.फूट आकाराचे आहेत. फुलबाजार परिसरात, बी बियाणे, खते, कीटकनाशके, सजावट साहित्य इ. पूरक व्यावसायिकांची संख्या पंचवीसपेक्षा अधिक आहे. फुलबाजार आडते असोसिएशन आणि फुलबाजार आडते व्यापारी संघटना अशा या व्यावसायिकांच्या दोन संघटना आहेत. फुलांची नाशवंतता आणि वाहतुकीचा खर्च विचारात घेता, शहराच्या आसपासच्या शेतकऱ्यांकडूनच पुरवठा होणे हे गृहीत आहे. यवत, खेड शिवापूर, लोणी, वाई, सातारा, सासवड, सोरतापवाडी, अहमदनगर, झेंडेवाडी तसेच कर्नाटक राज्यातूनसुद्धा या बाजारात फुले विक्रीसाठी येतात. ऑर्किडची फुले मुख्यत्वे थायलंडवरूनच येतात. अलीकडच्या काळात थेऊर ते यवत या पट्टय़ात मुख्यत्वे फुलशेती वाढण्याची कारणे समजून घेतली. कालव्याचे पाणी, सुलभ वाहतूक आणि रोखीच्या दैनंदिन व्यवहारांमुळे इतर पिके सोडून शेतकरी आता किफायतशीर फुलशेतीकडे वळल्याचे समजले. गुलछडी, झेंडू, शेवंती, अ‍ॅस्टर, गुलाब या फुलांना बाजार भाषेत सुट्टी फुले म्हणतात. जरबेरा, डच रोझ, कार्नेशन, ऑर्किड्स, ग्लॅडिओलस या फुलांना मुख्यत्वे पुष्पगुच्छ आणि सजावटीसाठी मागणी असते. फुलांची निर्यात मुंबई, जम्मू, भोपाळ इ. ठिकाणी मुख्यत्वे रेल्वे आणि हवाई सेवेतून होते. एकेका फुलांच्या दहापेक्षा अधिक प्रजाती समजून घेतल्यावर सामान्य माणूस आश्चर्यचकित होऊन जातो. फुलबाजाराचे अर्थकारण लक्षात घेताना आपले सणवार आणि फुलांची नाशवंतता हे दोन घटक महत्त्वाचे ठरतात. बदलत्या जीवनपद्धतीमुळे फुलांची मागणी वर्षभर टिकून आहे. मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात पूर्वी आडत्यांचे कमिशन १३ टक्के होते. कालांतराने १० टक्के आणि ६ टक्के वर आले आहे. यामध्ये इतर खर्च लक्षात घेता सद्य:स्थितीत ३ टक्के अधिभार शेतकऱ्यांकडून घेतला जात असल्याचे समजले. गणपती ते दिवाळी याच काळात फुलांना सर्वाधिक मागणी असल्याने सुमारे ५० टक्के भाववाढ याच काळात होते. फुलांचे भाव, प्रतवारीनुसार झेंडू ४० ते ७० रुपये, शेवंती ३० ते ६० रुपये, गुलाबगड्डी १० ते ३० रुपये असा सध्या भाव आहे. येथील फुलबाजाराची रोजची उलाढाल सरासरी ३० ते ४० लाखापर्यंत होते.

मार्केट यार्ड व्यतिरिक्त पुण्यामध्ये पूर्वी गुरुवार पेठेतील फुलवाला चौक आणि बाबूगेनू चौक येथे घाऊक बाजार भरत होता. फुलवाला चौकात मुख्यत्वे ताम्हाणे, खेडेकर, भुजबळ, परिवाराची दुकाने आणि थेऊर, हडपसर परिसरात त्यांची स्वत:ची फुलशेती होती. मुख्यत्वे रस्तारुंदीमुळे १९६५ नंतर या चौकातील व्यापार आता नावापुरताच शिल्लक आहे. बाबूगेनू चौक परिसरात, दत्तमंदिरा जवळ पूर्वी गोपाळकृष्ण थिएटर होते. ते बंद पडल्यावर तेथील काही भागात अगदी १९८५ पर्यंत फुलांचा घाऊक बाजार होता. आता या परिसरात केवळ किरकोळ व्यापारी आणि सजावटीचे व्यावसायिक आहेत. फुलांच्या बाजारपेठेचा विशिष्ट हंगाम असला तरी आता सर्व फुलांना एकूणच वर्षभर मागणी असते. त्याचा वेध घेणे उचित ठरेल. पुण्याची वाढती लोकसंख्या, इतर प्रांतीयांचे प्राबल्य आणि एकूणच जीवनमान लक्षात घेता सजावट आणि पुष्पगुच्छांसाठी सातत्याने मागणी वाढते आहे. पुष्पगुच्छाची किंमत १०० ते ५०० रुपयांपर्यंत, तर सजावटीचे कंत्राट किमान दहा हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत असते, असे समजते. फुलांच्या पुण्यातील व्यवसायात पाच हजारपेक्षा अधिक कुटुंबांचा सहभाग असून, सद्य:स्थितीत सर्व जाती-धर्मीयांचा त्यामध्ये समावेश आहे. केवळ सजावटीच्या क्षेत्रात आठशेपेक्षा अधिक व्यावसायिक असून, इव्हेंट-कल्चर हे या व्यवसायास पोषक ठरत असल्याची माहिती मिळाली. केवळ पुष्पगुच्छ विकणारे अनेक जण महत्त्वाच्या रस्त्यांवरील अनेक चौकात आपल्याला दिसतात. गजरे विकणारे शेकडो जण आपल्याला बागा आणि थिएटर, रंगमंदिर परिसरात दिसतात. पूर्वी मंदिर परिसरात फुलपुडे आणि पूजेचे ताट देणारे अनेक जण आता फ्लॉव्हर डेकोरेटर झाले आहेत. पूर्वी ऊस शेती करणाऱ्या अनेकांनी रोकड व्यवहाराच्या आकर्षणाने, फुलशेतीकडे आपला मोहरा वळवला आहे. एवढेच काय, सद्य:स्थितीत आपण रहदारीत, एखाद्या सिग्नलला थांबलो तर पुलाखाली राहणारी मंडळी, आकर्षक पॅकिंगमध्ये डच रोझेस विकताना आपल्याला बारमाही दिसतात. सोनचाफ्याची फुलेदेखील प्लॅस्टिकच्या छोटय़ा पिशवीत उपलब्ध असतात. कोरांटी, बकुळ, कृष्णकमळ, हिरवा आणि कवठी चाफ्याने मात्र अजून बाजारपेठ पाहिलेली नाही.

जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाने वेळोवेळी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी फुलांची साथ घेतली आहे. सर्व भाषांमध्ये, फुलांशी संबंधित अनेक शब्दप्रयोग ,वाक्प्रचार, म्हणी, काव्य, शेरोशायरी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. फुलांच्या विश्वाचा, पुणे शहराचा विचार करून व्यावहारिक जगताचा गंध, सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

पुण्यातील बाजारपेठेचा विचार करताना काही घराण्यांचा उल्लेख आवश्यक ठरतो. भोसले, वीर, पाषाणकर, बनकर, गायकवाड, मोहिते अशी काही घराणी, तसेच बाजारपेठेच्या माहितीसाठी प्रशांत ताम्हाणे, सुभाष सरपाळे यांनी उपयुक्त माहिती दिली. सोरतापवाडी येथील अप्पा कड यांनी प्रत्यक्ष त्यांच्या फुलशेतीवर नेले. बाबूगेनू चौकात गजानन धावडे यांनी व्यवसायातील बदल सांगितले. मार्केट यार्ड फुलबाजार समितीचे प्रमुख एन. डी. घुले तसेच विलास भुजबळ, सतीश उरसळ यांनी एकूणच बाजारपेठेची माहिती दिली. या सर्वाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 3:01 am

Web Title: flowers market
Next Stories
1 परदेशी पाहुण्यांना ‘परिषदा दर्शन’
2 उमेदवाराची चिल्लर, निवडणूक अधिकाऱ्यांचा ‘गोंधळ’
3 हिंजवडीत तरुणीच्या खुनामुळे कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे – अजित पवार
Just Now!
X