20 September 2018

News Flash

‘लाख’मोलाची बासरीवादन कला

बासरीवादनातून मिळालेला निधी सामाजिक कार्यासाठी देण्याची जाणीव जपणाऱ्या सुभाष शहा यांच्यासाठी ही कला अगदी ‘लाख’मोलाची ठरली आहे.

सुभाष शहा

बासरीवादनातून मिळालेला निधी सामाजिक कार्यासाठी देण्याची जाणीव जपणाऱ्या सुभाष शहा यांच्यासाठी ही कला अगदी ‘लाख’मोलाची ठरली आहे.   आपल्या आविष्कारातून मिळालेला एक लाख रुपयांचा धनादेश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या ‘नाम फाउंडेशन’ला देत कलाकाराचे सामाजिक भान जागृत असल्याची प्रचिती शहा यांनी दिली.
समाजहिताची कामे करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सवरेदय सीनियर सिटिझन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जानेवारीमध्ये सुभाष शहा यांचा ‘बांसुरी के बोल’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यातून मिळालेला एक लाख रुपयांचा धनादेश हा शहा यांनी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडे सुपूर्द केला. उद्योजक विष्णू मुजूमदार आणि जयप्रकाश कोठडीया या वेळी उपस्थित होते.
भगवान श्रीकृष्णाचे वाद्य अशी बासरीची ओळख. पं. पन्नालाल घोष आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी हे वाद्य जगभर अजरामर केले. हे वाद्य शिकण्याची माझी बालपणापासूनची इच्छा होती. पण, शिक्षण आणि व्यवसाय यामुळे हे शक्य झाले नाही. चार्टर्ड अकौंटंट म्हणून मी अजूनही काम करतो. वयाच्या ६३ व्या वर्षी बासरीवादन शिकण्यास सुरूवात केली. विवेक सोनार आणि मििलद दाते यांच्याकडे प्राथमिक शिक्षण घेतले असून आता प्रसिद्ध बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी यांच्याकडे शिक्षण घेत आहे, असे सुभाष शहा यांनी सांगितले.
बासरीवादनामध्ये प्रावीण्य संपादन केले असून स्वतंत्रपणे कार्यक्रम करू शकतो, असा आत्मविश्वास मला वयाच्या ६८ व्या वर्षी आला. सवरेदय सीनियर सिटिझन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जानेवारीमध्ये ‘क्लासिकल मेड सिंपल’ या भूमिकेतून ‘बांसुरी के बोल’ हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे केला होता. या कार्यक्रमातून मिळालेला निधी सामाजिक कामासाठी द्यायचा हे मी आधीच ठरविले होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या दातृत्वाचा कित्ता गिरवीत मी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणाऱ्या नाम फाउंडेशनला अल्पशी मदत करू शकलो याचा आनंद आहे. शास्त्रीय संगीत अवघड नाही, त्यामुळे अधिकाधिक लोकांनी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. जूनमध्ये पं. रूपक कुलकर्णी यांच्यासमवेत कार्यक्रम करणार असून त्यातून मिळणारे उत्पन्नही दुष्काळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्याचा मानस असल्याचे शहा यांनी सांगितले.

HOT DEALS
  • Apple iPhone 7 32 GB Black
    ₹ 41498 MRP ₹ 50810 -18%
    ₹6000 Cashback
  • Lenovo K8 Plus 32GB Venom Black
    ₹ 8925 MRP ₹ 11999 -26%
    ₹446 Cashback

First Published on April 12, 2016 3:19 am

Web Title: flute music art
टॅग Art,Flute,Music