पिंपरी : उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या निगडी भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी (३० जून) परस्पर उद्घाटन केले. उड्डाणपूल तयार होऊन चार आठवडे झाल्यानंतरही सत्ताधारी भाजपकडून तो खुला करण्यात येत नसल्याचे कारण देत राष्ट्रवादीने आंदोलनाचा मार्ग पत्करला.

निगडीतील सुमारे ९० कोटी खर्चाच्या भक्ती-शक्ती उड्डाणपुलाची सर्व कामे ३१ मे पूर्वीच पूर्ण झाली आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापैकी कोणाच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करायचे, यावरून पेच निर्माण झाला होता. तोडगा निघत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडले होते. पुलावरून वाहतूक सुरू होत नसल्याने या मार्गावरून दररोज जाणाऱ्या लाखभर वाहनस्वारांना तसेच स्थानिक रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत होता.

उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने खुला करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. तरीही भाजपकडून अपेक्षित कार्यवाही होत नव्हती. या पार्श्वभूमीवर, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पुलाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या या आंदोलनात शिवसेनेचे प्राधिकरणातील नगरसेवक अमित गावडे देखील सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीचा प्रसिद्धीसाठी आटापिटा

उड्डाणपुलाची बरीच कामे बाकी असताना राष्ट्रवादीने फक्त प्रसिद्धीसाठी उद्घाटन केले आहे, अशी टीका भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे. निवडणुकांच्या तोंडावर पक्षाचे नसलेले अस्तित्व दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचा आटापिटा यातून दिसून येतो, असे ढाके म्हणाले.