News Flash

बोपखेलच्या उड्डाणपुलासाठी दीड वर्षे तरी लागतील – आयुक्त

महापालिका मुख्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे

’ तरंगत्या पुलाची जबाबदारी स्वीकारण्यास पालिका तयार
’ जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या महत्त्वाची बैठक
लष्कराने बोपखेल येथील तरंगता पूल काढून टाकण्याचे स्पष्ट केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (३० मे) जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पिंपरीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बोपखेल येथील उड्डाणपूल होण्यास दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे सांगत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याची जबाबदारी स्वीकारण्यास महापालिका तयार असल्याची भूमिका आयुक्तांनी मांडली.
महापालिका मुख्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीसाठी जिल्हाधिकारी राव, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, खासदार, आमदार व पालिकेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळी बोपखेलच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी बोपखेलची पाहणी केल्याचे सांगून आयुक्त म्हणाले, की पिंपरी पालिकेच्या वतीने बांधण्यात येणारा पूल तयार होण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. तो पूल आम्हाला हस्तांतरित करा, त्याच्या देखभालीचा खर्च आम्ही करू, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात येणार आहे. या बैठकीत पिंपरी डेअरी फार्मच्या उड्डाणपुलाच्या विषयावरही चर्चा होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी पालिकेचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 2:16 am

Web Title: flyover will take one and a half years says pcmc commissioner
टॅग : Pcmc Commissioner
Next Stories
1 दृश्यकलेबाबत मराठी माणसांची दैन्यावस्थाच
2 द्रुतगती मार्गावर दिवसभर वाहतुकीचा विचका
3 क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेण्यासाठी व्हॉटसअ‍ॅप ग्रुप..
Just Now!
X