26 September 2020

News Flash

‘प्रेमाकडून प्रेमाकडे’.. मोठय़ांच्या अव्यक्त प्रेमावर प्रकाश!

मोठय़ा व्यक्तींच्या अव्यक्त प्रेमावर प्रकाशझोत टाकणारे ‘प्रेमाकडून प्रेमाकडे’ हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे.

| February 14, 2014 03:30 am

प्रेम आणि मैत्री या संकल्पनांचा वेगळ्या सकारात्मक अंगाने विचार करीत समाजातील मोठय़ा व्यक्तींच्या अव्यक्त प्रेमावर प्रकाशझोत टाकणारे ‘प्रेमाकडून प्रेमाकडे’ हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे. छोटय़ा व्यक्तिगत प्रेमाकडून मानवसमूहाच्या प्रेमाकडे घेऊन जाणारा विचार, ही मध्यवर्ती संकल्पना असलेले हे पुस्तक प्रसिद्ध कवयित्री-लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या लेखणीतून साकारले आहे. 
नामदार गोपाळ कृष्ण गोखले, भगिनी निवेदिता, सरोजिनी नायडू, सेनापती बापट, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, नोबेल पारितोषिकप्राप्त कवी रवींद्रनाथ टागोर यांसह १५ व्यक्तिमत्त्वांचा वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे. याविषयी डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, ‘प्रेमाकडून प्रेमाकडे’ हा विषय मांडताना प्रेम आणि मैत्री या संकल्पनांचा विचार केला आहे. या दोन्हीकडेही आपण मोकळेपणाने पाहतोच असे नाही. प्रेम आणि मैत्री यापलीकडे जाणाऱ्या अनेक गोष्टींचे धागे या नात्याभोवती गुंफले गेलेले असतात. त्यामुळे ‘प्रकरण’ असे न संबोधता त्यापलीकडे जाऊन विचार करावा लागतो. अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक आणि प्रेरक आधार देणारे प्रेम हे विश्वासार्ह वाटते. प्रेमाने आयुष्य घडते किंवा मोडते. पण, काही स्त्री-पुरुषांच्या संदर्भातील प्रेम-मैत्री किंवा स्नेह या संकल्पनांना ऐतिहासिक प्रमाणांचा आधार देत त्यांच्या भावनिक आयुष्यातील संदर्भाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. यातील अनेक स्नेह हे प्रेमाच्या पातळीवर अव्यक्तच राहिले आहेत.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी व्यक्तिमत्त्वाचे धागे जोडलेल्या व्यक्ती असतात. अशा वेळी त्यांचा विचार विस्ताराने करावा लागतो. माणसातील धैर्य, व्यक्तिगत आनंदाला नकार देणे, स्वत:पलीकडे जाऊन देश आणि समाजाच्या हिताचा विचार करणे हे अधिक महत्त्वाचे वाटते. त्याची किंमत याही गोष्टींनी मोजायला हवी. त्यामुळे छोटय़ा व्यक्तिगत प्रेमाकडून मोठय़ा मानवजातीच्या प्रेमाकडे घेऊन जाणारा विचार हाच या पुस्तकाच्या केंद्रस्थानी असल्याचे ढेरे यांनी सांगितले.
नामदार गोखले यांच्या जीवनकार्यामध्ये सरला राय या महिलेचे योगदान आहे. त्यांच्यातील हे प्रेमसंबंध कधी व्यक्त झाले नाहीत हे खरे असले तरी सरला राय या गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारलेल्या होत्या. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनामध्ये कृष्णाबाई केळवकर यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. या महिलांनी व्यक्तिगत प्रेम बाजूला ठेवत आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी घेतली. त्यामुळे नामदार गोखले आणि महर्षी शिंदे हे समाजासाठी कार्य करू शकले. अशा गोष्टींवर ‘प्रेमाकडून प्रेमाकडे’ या पुस्तकामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 3:30 am

Web Title: focus love legend personality
टॅग Love
Next Stories
1 असाही ‘व्हॅलेंटाइन डे’! – विविध संघटनांतर्फे कल्पक उपक्रमांचे आयोजन
2 आम्हाला कोण दत्तक घेणार?
3 फॅमिली डॉक्टर्स उभारणार ‘मेडिसीन बँक’
Just Now!
X