करोना संसर्ग आणि टाळेबंदीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून लोककलावंत अडचणीत सापडले आहेत. या कलावंतांच्या मदतीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतीय लोककला अभ्यास संशोधन आणि संवर्धन केंद्राने पुढाकार घेतला आहे. केंद्रातर्फे ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान ‘लोककला २०२०’ या ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे वीस लोककलांतील कलावंत सादरीकरण करणार आहेत.

विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी ही माहिती दिली. भारतीय लोककला अभ्यास संशोधन आणि संवर्धन केंद्रातर्फे लोककलांच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी विविध उपक्रम राबवले जातात. करोना संसर्गाच्या गेल्या आठ महिन्यांच्या काळात सादरीकरण करता न आल्याने लोककलावंत अडचणीत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी ‘लोककला २०२०’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

‘लोककला २०२०’ उपक्रमात वीस दिवस लोककलावंत विद्यापीठाच्या ऑनलाइन माध्यमाद्वारे सादरीकरण करतील. रोज रात्री आठ वाजता या सादरीकरणाचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे डॉ. भोळे यांनी सांगितले.

उपक्रमात पोवाडा, वासुदेव, जात्यावरची गाणी, जागरण, हलगीवादन, गवळण, तमाशाची गाणी, लावणी, पोतराज, गवळण, गोंधळ, बतावणी अशा कला सादर केल्या जाणार आहेत.

गेल्या आठ महिन्यांत कलावंत अडचणीत असल्याने त्यांच्या मदतीसाठी टेक महिंद्राच्या सहकार्याने जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. मात्र या कलावंतांना काही प्रमाणात आर्थिक हातभार मिळण्याच्या दृष्टीने ‘लोककला २०२०’ या उपक्रमाद्वारे मानधन स्वरूपात रक्कम दिली जाणार आहे.

— डॉ. प्रवीण भोळे, विभाग प्रमुख, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ