‘ग्यानबा-तुकोबां’ंच्या श्री क्षेत्र देहू आणि आळंदीच्या कुशीत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात तिसरे अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन दिमाखात पार पडले. औद्योगिकीकरणातून उभी राहिलेली कामगारांची श्रमसंस्कृती, अल्पावधीत झालेल्या शहरविकासातून उभी राहिलेली नागरी संस्कृती आणि शहरी लोकजीवनात सहभागी होऊनही मूळचे गावपण टिकवणारी ग्रामसंस्कृती अशी संमिश्र लोकसंस्कृती या नगरीत नांदत आहे. उद्योगनगरीतील दोन दिवसाच्या या संमेलनाने लोककलांचा भावसुंदर आविष्कार अनुभवास आला.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा, लोकरंग सांस्कृतिक मंच आणि पिंपरी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे आयोजित केलेले दोन दिवसीय तिसरे मराठी लोककला संमेलन दिमाखात पार पडले. गण, गवळण, पोवाडा, लावणी, कटाव, भारूड, लळीत, कीर्तन, दशावतार, जागरण, गोंधळ, भराड, तमाशा अशा समृद्ध लोककलेचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. ते सादर करणारे राज्याच्या विविध भागांतील लोककलावंतांचे प्रतिनिधी संमेलनात सहभागी झाले होते. संमेलनस्थळाला शाहीर पठ्ठे बापूराव नगरी तर, व्यासपीठाला शाहीर योगेश असे नाव देण्यात आले होते. संमेलनाच्या शोभायात्रेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी म्हणून सर्वपरिचित असलेले पाटील काही वर्षे िपपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त व प्राधिकरणाचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे शहरातील लहानसहान गोष्टींची त्यांना इत्थंभूत माहिती आहे. स्थानिक पातळीवरील संदर्भ देत त्यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीने कार्यक्रमाचा नूरच पालटला होता. संमेलनाच्या निमित्ताने लोककलेत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव तसेच प्रसिद्ध लेखक प्रभाकर मांडे यांना कलागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मात्र, पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना व्यासपीठावर का स्थान देण्यात आले नाही, याचे कोडे उपस्थितांना उलगडले नाही. लोककलाकार वसंत अवसरीकर, मुरलीधर सुपेकर, संजीवनी मुळे नगरकर, प्रतीक लोखंडे, सोपान खुडे, पुरुषोत्तम महाराज पाटील, बापूराव भोसले यांचाही यथोचित गौरव झाला. निवेदक नाना शिवले यांनी घेतलेली डॉ. देखणे यांची मुलाखत चांगलीच रंगतदार झाली. देखणे यांच्या जन्मापासून ते आजवरचा प्रवास या मुलाखतीद्वारे उलगडण्यात आला. ‘पारंपरिक तालवाद्य कचेरी; लोककला तालाविष्कार’ या कार्यक्रमाने सर्वाचीच मनेजिंकली. संगीत संयोजक संतोष घंटे, अझरूद्दीन शेख, राहुल कुलकर्णी, विलास अटक, सारंग भांडवलकर, विनायक गुरव यांनी आपापली कला सादर केली. त्यास रसिकांनी उभे राहून दाद दिली. स्थानिक कलावंतांचा कलाविष्कार, ‘पंचरंगी पठ्ठे बापूराव’, ‘महाराष्ट्राची लोकधारा’ असे विविधांगी कार्यक्रम पार पडले. मात्र, ‘लोककलांच्या संवर्धनात माध्यमांची भूमिका सकारात्मक की नकारात्मक’ या विषयावरील परिसंवाद रद्द करण्यात आला. या संमेलनासाठी नाटय़ परिषदेने महापालिकेचे अर्थसहाय्य घेतले आणि सहसंयोजक म्हणून त्यांचा सहभाग करवून घेतला. ही त्यांची घोडचूक ठरली. महापालिकेचा कर्मदरिद्रीपणा आणि नियोजनशून्य कारभाराची प्रचिती त्यांना आली. त्यातून मनस्तापाशिवाय काहीच हाती लागले नाही.

लोककलावंतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे लोककला संमेलनाचे अध्यक्ष होते. पिंपरी प्राधिकरणातील नोकरीच्या निमित्ताने तसेच वैयक्तिक स्नेहसंबंधांमुळे आयुष्यातील ३५ वर्षे पिंपरी-चिंचवडकरांच्या सहवासात त्यांनी काढली आहेत. संत साहित्याप्रमाणे लोककलेविषयीचा त्यांचा व्यासंग वादातीत आणि सर्वश्रुत आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदी त्यांची निवड खऱ्या अर्थाने योग्य अशीच होती. संमेलनाच्या उद्घाटनाचे भाषण, संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या पुस्तिकेतील मनोगत आणि प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून डॉ. देखणे यांनी लोककलेविषयीची आपली भूमिका विस्ताराने मांडली. संतांनी महाराष्ट्राला ‘ज्ञानसागर’ केले. सुधारकांनी ‘बुद्धिसागर’ केले. तर, लोककलावंतांनी ‘भावसाक्षर’ केले. त्यामुळे लोककलावंतांना लोकसाहित्यकार म्हणून प्रतिष्ठा मिळायला हवी. तसेच, अशा कलावंतांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. लोकसंस्कृतीचा वारसा म्हणून लोककला जपायला हव्यात. अजूनही लोककलावंतांकडे अभिजात कलाकारांच्या भूमिकेतून पाहिले जात नाही. पोटार्थी कला आणि पोटार्थी कलावंत म्हणून त्यांची उपेक्षाच होत आहे. एकेकाळी लोककला राजाश्रय आणि लोकाश्रयावर जगत होत्या. आज त्यांचा राजाश्रय संपला आहेच. आधुनिक समाजरचनेमुळे त्यांना लोकाश्रय मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कलेच्या अंगाने पोट भरणे दुरापस्त झाले आहे. या कला जगवायच्या असतील तर लोककलावंत जगले पाहिजे व त्यासाठी लोककलावंतांना राजाश्रय मिळायला हवा. शासनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये लोककलावंतांना स्थान मिळायला हवे. शासनाचे लोककला महोत्सव खेडय़ापाडय़ात झाले पाहिजेत. उपेक्षित कलावंतांचा शासनाने विचार केला पाहिजे. लोककला आणि लोकभूमिकांचा पारंपरिक ठेवा पूर्णपणे जपण्यासाठी त्यांचे संपूर्ण चित्रीकरण झाले पाहिजे. लोककलेच्या मौखिक संहिता लिखित स्वरूपात आणल्या पाहिजेत. यासंदर्भात काम करणाऱ्या विविध संशोधकांना एकत्र आणून लोककलांचे सर्वसमावेशक संशोधनात्मक रूप मांडले गेले पाहिजे. लोककलेकडे आता लोककलाशास्त्र म्हणून पाहायला हवे व त्यासाठी लोककलांचे स्वतंत्र विद्यापीठ हवे.

balasaheb.javalkar@expressindia.com