पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम येत्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, खेड-शिवापूर टोलनाका बंद करण्याचा शासनाचा उद्देश नाही. ठेकेदाराने केलेल्या सदोष आणि अपूर्ण कामांमुळे वाहतूक कोंडी, अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी येथील काम पूर्ण होऊन स्थानिक नागरिक, प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी संबंधित टोलनाका आणि रस्त्याच्या सद्य: परिस्थितीचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य शासनाला पाठवला आहे, असेही राम यांनी स्पष्ट केले.

पुणे ते सातारादरम्यान महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले होते. रिलायन्स आणि एनएचएआय यांच्यात झालेल्या करारानुसार २०१० मध्ये सुरू झालेले रस्त्याचे काम मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही आणि रस्त्याची अवस्थाही दयनीय झाली आहे.

सेवा रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले काम, रस्त्याचे सहापदरीकरण ही कामे रखडल्याने वाहतूककोंडी होत असल्याने स्थानिक नागरिक, प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, सेवा रस्त्याबाबत स्थानिकांना विचारात न घेता रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता देखील चुकीचा असल्याने शेतमाल नेणाऱ्या बैलगाडय़ा, ट्रॅक्टर, शेतीविषयक वाहने आणि स्थानिक वाहनांना महामार्गाशिवाय पर्याय नाही.

याबाबत ठेकेदाराला वेळोवेळी नोटीस बजावण्यात आल्या तरी ठेकेदाराने लक्ष दिले नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, स्थानिक नागरिक, शेतकऱ्यांनी हा टोलनाका बंद करून पुढे २० किलोमीटर अंतरावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रात करावा, अशी सातत्याने मागणी केली आहे. मात्र, याबाबतचा निर्णय केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना टोलनाका बंद करता येत नाही. केवळ स्थानिकांचे म्हणणे एनएचएआयला कळवले असून जिल्हाधिकारी म्हणून टोलनाका बंद करण्याबाबत कोणतीही शिफारस केलेली नाही, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामात एनएचएआयचा कोणताही दोष नसून रस्त्याच्या दुरवस्थेला ठेकेदार जबाबदार आहे, असेही त्यांनी सांगितले.