पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची फरफट अद्यापही कायम आहे. औषध विक्री दुकानांमधील इंजेक्शनची विक्री बंद करून अन्न व औषध प्रशासनाकडून थेट रुग्णालयांना देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाइकांनी रेमडेसिविर मिळण्यासाठी गुरुवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले.

गेल्या वर्षभरातून राज्यासह देशातील करोना साथीचे केंद्रस्थान असलेल्या पुण्यात सोमवारी आणि मंगळवारी १२ हजार ७९७ इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. बुधवारी इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा गरजेपेक्षा अधिकचा वापर होत असल्याने टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिविर पुण्यात कोठेच मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हैराण झाले असून त्यांनी थेट बंडगार्डन चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच धरणे धरले. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. इंजेक्शन तातडीने उपलब्ध करुन द्या, अन्यथा रुग्णाची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असे खासगी रुग्णालयांकडून सांगण्यात येत आहे, असे धरणे धरून बसलेल्या नातेवाइकांनी सांगितले.

नेमकी समस्या काय?

शासकीय रुग्णालये, करोना काळजी केंद्रे या ठिकाणी दर दोन रुग्णांमागे एकाला रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येत आहे. तर, याउलट खासगी रुग्णालयांमध्ये सरसकट सर्व रुग्णांना रेमडेसिविर देण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात या इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. संसर्गापासून नवव्या दिवसानंतर रेमडेसिविर दिल्यास त्याचा उपयोग होत नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे सांगणे आहे. मात्र, त्याचे पालन खासगी रुग्णालयांकडून होत नसल्यानेच रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याकरिता भरारी पथके ही स्थापन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

दिल्ली येथून विशेष विमानाने ३५०० एवढ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा गुरुवारी पुण्यात दाखल झाला. मात्र, सध्याची इंजेक्शनची मागणी पाहता हा साठा अपुरा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, गुरुवारी रात्री इंजेक्शनचा आणखी साठा पुण्यात येणार आहे. – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी