पुणे ग्रामीण भागातील चाकण परिसरात आज अन्न-औषध विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १ कोटी ७० लाख किमतीचा गुटखा जप्त केला आहे. चाकणच्या कुरळीफाटा भागात ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत अन्न-औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमल गुटखा आणि सुगंधी सुपारीचा मोठा माल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकासह गुटखा व्यापारी निलेश बोराटे याला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनूसार, चाकण भागातील गुटखा व्यापारी निलेश बोराटे याच्याकडे चार ट्रकद्वारे विमल पान मसाला, गुटखा आणि सुगंधी सुपारीचा मोठा माल येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील डोरगे यांनी सापळा रचत या चारही वाहनांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. चार ट्रकपैकी दोन ट्रक हे गुजरात तर एक ट्रक महाराष्ट्रातला असल्याचं समजतंय. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. ट्रकचालक सोनू मेवालाल सरोज, दीपक रामभरत मौर्या, मनोज संताराम यादव, आणि संतोष अमरनाथ चौरसिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या कारवाईत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील डोरगे यांच्यासह त्यांचं पथक, अन्न सुरक्षा सहायक आयुक्त अर्जुन भुजबळ, संजय नारागुडे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रदिप फावडे, शुभांगी अंकुश, संतोष सावंत, इम्रान हवालदार, लक्ष्मीकांत सावळे, किरण जाधव, अविनाश भांडवळकर, रवींद्र जेकटे, विकास सोनवणे या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.