महाराष्ट्रामध्ये करोनाचं संकट पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीच्या दृष्टीने ठाकरे सरकारने ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील असं जाहीर केलं आहे. राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरु होईल असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान या घोषणेनंतर लगेचच पुण्याच्या आयुक्तांनाही पत्रक जारी करत या मिशन बिगीन अगेनबरोबरच ३१ डिसेंबरची नियमावली जारी केली आहे. विशेष म्हणजे ११ वाजल्यानंतर संचारबंदीची घोषणा करण्यात आली असतानाच पुण्यामध्ये ३१ डिसेंबर रोजी हॉटेलमधून येणारी होम डिलेव्हरीही केवळ पावणे अकरापर्यंत सुरु राहणार असल्याचं या नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

पुण्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आज एक आदेश जारी केला आहे. यामध्ये त्यांनी ३१ डिसेंबरची नियमावलीसंदर्भातील दहा मुद्द्यांची माहिती दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी पुण्यामध्ये कोणत्या गोष्टी कधीपर्यंत सुरु राहतील तसेच नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत. यापैकी पाचवा मुद्दा हा होम डिलेव्हरीसंदर्भात आहे. पुणे महानगरपालिका श्रेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ तसेच बार ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत. सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ रात्री पावणे अकराला बंद होतील. त्याचप्रमाणे होम डिलेव्हरीची सुविधाही पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहे, असं या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

आणखी वाचा- ‘थर्टीफर्स्ट’चं प्लॅनिंग करताय? आधी गृहमंत्र्यांनी दिलेल्या सूचना वाचाच

दरम्यान, आज सकाळीच राज्य सरकारकडून लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढण्यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्द करण्यात आला. यामध्ये त्यांनी राज्य सरकार करोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं सांगितलं आहे. तसंच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे. याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. या नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणामे सुरु राहणार आहेत.