अन्न व औषध प्रशासनाकडे आपल्या वार्षिक उलाढालीचा परतावा (रिटर्नस्) भरण्यात अन्न उत्पादक मागेच आहेत. हा परतावा उत्पादकांनी ३१ मे पर्यंत भरणे आवश्यक होते. त्यानंतर दिवसागणिक परताव्यावरील दंड वाढत चालला असून आतापर्यंत केवळ ६० टक्के अन्न उत्पादकांनी परतावा भरला आहे. अन्न विभागाचे सहायक आयुक्त शिवाजी देसाई यांनी ही माहिती दिली.  
वर्षभरात किती किलो उत्पादन केले, त्यासाठी आलेला खर्च, विक्रीतून मिळालेली रक्कम याबद्दलचा तपशील अन्न उत्पादकांनी ‘डी १’ फॉर्म स्वरूपात एफडीएकडे भरणे बंधनकारक असते. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीतील उलाढालीचा परतावा उत्पादकांनी ३१ मेपर्यंत विलंब शुल्काशिवाय भरायचा होता. १ जूनपासून पुढे परतावा भरण्यासाठी प्रत्येक दिवशी शंभर रुपयांचे विलंब शुल्क भरावे लागत आहे. सप्टेंबरअखेर काही अन्न उत्पादकांनी परतावा भरला असून त्यांना चार महिन्यांचे तब्बल बारा हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागले असल्याचे देसाई यांनी सांगितले. अधिक दंड टाळण्यासाठी उत्पादकांनी लवकरात लवकर परतावा भरावा, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे.
हा परतावा केवळ अन्न उत्पादकांनी भरायचा असून हॉटेल, रेस्टॉरंट, किरकोळ व घाऊक विक्रेते आणि वितरकांना त्यातून वगळण्यात आले आहे.