महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू असली, तरी त्यांच्या दर्जाबाबत अनेक शंका घ्याव्यात अशीच परिस्थिती आहे. संभाजी उद्यानासमोरही सध्या पदपथ तयार करण्याचे काम सुरू असून या पदपथासाठीचे ब्लॉक सिमेंटचा वापर न करता फक्त ठोकून-ठाकून बसवले जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशाप्रकारे केले जात असलेले काम किती दिवस टिकणार असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे.
शहरात विविध ठिकाणी पदपथ करण्यासाठी इंटरलॉकिंग ब्लॉक्सचा वापर सध्या केला जातो. संभाजी उद्यानासमोर मात्र पदपथासाठी तसे ब्लॉक न वापरता सिमेंटचे मोठे ब्लॉक वापरले जात आहेत. पदपथासाठी तयार करण्यात आलेल्या पायावर सिमेंटचा कोबा तयार करण्यात आला असून त्यावर बारीक खडीचा थर पसरण्यात आला आहे. या थरावरच हे ब्लॉक बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, ते बसवताना फक्त ठोकून बसवले जात आहेत. दोन ब्लॉक एकमेकांजवळ बसवल्यानंतर त्यात मधे जी फट राहते ती बंद करण्यासाठी वाळू, सिमेंट वा सिमेंटचा पातळ थर यांचा वापर केल्याचे या कामात दिसत नाही. त्यामुळे फक्त ठोकून-ठोकून बसवलेले हे ब्लॉक एकमेकांत कसे अडकून राहतील असा प्रश्न आहे. तसेच एखादा ब्लॉक निघाल्यानंतर त्याच्या आजूबाजूचेही ब्लॉक निघून येण्याची भीती या कामात आहे.
या भागात आतापर्यंत जेथे काम झाले आहे त्या पदपथाची पाहणी केली असता त्यावरचे ब्लॉक फक्त शेजारी-शेजारी ठेवून बसवण्यात आल्याचे दिसत आहे. ते केव्हाही ढिले होऊ शकतात, तसेच पावसाळ्यात त्यातील फटींमध्ये पाणी गेल्यानंतर ते खिळखिळे देखील होऊ शकतात. अशा खिळखिळ्या झालेल्या ब्लॉकमधील एक ब्लॉक उघडला गेला की अन्यही उखडायला सुरुवात होते. मात्र, या उणिवांकडे दुर्लक्ष करूनच हे काम केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.