दुधाला ५ रूपये दरवाढ मिळावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पुंगी बजाओ’ आंदोलन केले. राज्य सरकार सातत्याने गरीब, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे. दुधाचा भाव वाढलाच पाहिजे असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या मागे आम्ही आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी पोटतिडकीने मागण्या मांडत असताना या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. आता दूधासाठी हक्काचा दर तो मागतोय. मुख्यमंत्री तुम्ही जागे व्हायलाच हवे. यासाठीच आज राष्ट्रवादीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. दूध दराच्या या आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा आहे.

शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधाकडे विद्यमान राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. दुधाला योग्य दर देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. गुजरात सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेज दिले आहे. महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.