नाशिक येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ललित अंगाने विज्ञानविषयक लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव चर्चेत आले आहे. काही मुद्दय़ांवर स्पष्ट राहून डॉ. नारळीकर यांनी या प्रस्तावाला होकार दिला आहे.

जागतिक कीर्तीचे संशोधक आणि विज्ञान लेखक डॉ. नारळीकर यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळावा, अशी चर्चा साहित्यवर्तुळात सुरू झाली आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये अद्याप विज्ञानलेखकाला हा सन्मान मिळालेला नाही, ही उणीव यानिमित्ताने दूर होईल, या भावनेतून हे प्रयत्न सुरू झाले आहेत. करोना महामारीच्या काळात डॉ. नारळीकर यांचे विचार समाजाला मार्गदर्शक ठरतील, अशी भूमिका मांडली जात आहे.

संमेलनाध्यक्षपदाच्या प्रस्तावाला काही मुद्दय़ांवर स्पष्ट राहून संमती दिली असल्याचे ज्येष्ठ गणिती संशोधक डॉ. मंगला नारळीकर यांनी सांगितले. डॉ. नारळीकर यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांना तीनही दिवस तेथे उपस्थित राहणे शक्य होणार नाही. पहिल्या दिवशी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे, त्या दिवशी उपस्थित राहून ते अध्यक्षीय भाषण करू शकतात. नंतरच्या दिवशी त्यांचे ऑनलाइन व्याख्यान किंवा मुलाखत घेता येणे शक्य होईल; पण तीनही दिवस अध्यक्षाने उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा परामर्श घ्यावा किंवा त्यावर आपली टीकाटिप्पणी करावी, अशी अपेक्षा असेल तर ते शक्य होणार नाही, हे स्पष्ट केले आहे, असे डॉ. मंगला नारळीकर यांनी सांगितले. कोणीही योग्य उमेदवार असेल तर आम्हाला आनंद आहे. त्यामध्ये राग-लोभाचा काही प्रश्नच नाही, असे डॉ. मंगला नारळीकर यांनी म्हटले आहे.