भाऊजीचे घेतलेले ८० हजार परत करण्यासाठी मेहुण्याने पेट्रोल पंपाचे ऑफिस फोडून तब्बल साडेसात लाख रुपये साथीदाराच्या मदतीने लंपास केले होते. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार अवघ्या काही तासातच मुख्य आरोपीसह दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी नारायण आप्पा पवार आणि साथीदार रमेश प्रभू पवार अशी  दोन्ही आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलिसांनी रोख रक्कम साडेसात लाख रुपये आरोपींकडून जप्त केले आहेत.

आरोपी नारायण हा मुलाणी पेट्रोल पंपावर काही महिन्यांपासून काम करत आहे. त्यानेच सर्व योजना करून पेट्रोल पंपाच्या ऑफिसमधील रोख रक्कम चोरायची आणि भाऊजीचे घेतलेले ८० हजार परत करण्याचे असे ठरवले होते. त्यानुसार पंपावर काम करत असताना प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून,. दुसऱ्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या रमेशला सोबतीला घेऊन साडेसात लाख रुपये त्याने लंपास केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीमधील नाशिक- पुणे महामार्गावर असणाऱ्या मुलाणी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमधून खिडकी तोडून आत प्रवेश करत. सीसीटीव्हीवर चादर झाकून ७ लाख ४५ हजारांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अत्यंत हुशारीने हा गुन्हा करण्यात आला होता.  मात्र यावरून पोलिसांना अगोदरच ओळखीतल्या व्यक्तीने चोरी केल्याचा संशय होता. मुख्य आरोपी नारायण याच्यावर संशय आणि तसेच पेट्रोल पंपावरील सर्व सीसीटीव्ही चेक करण्यात आले, तेव्हा नारायण आणि त्याचा साथीदार यांच्या हालचालींवर संशय आला त्यानुसार दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

नारायणला भाऊजीचे घेतलेले ८० हजार परत करायचे होते. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.