घटनास्थळावरू न पुरावे गोळा करण्यासाठी फिरती न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा

खून, बलात्कार, दरोडा किंवा दहशतवाद्यांकडून घडविण्यात आलेला बॉम्बस्फोट अशा गंभीर गुन्ह्य़ात पोलिसांबरोबर घटनास्थळी पोहोचून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचे महत्त्वाचे काम न्यायवैद्यकीय तज्ज्ञ पार पाडतात. गंभीर गुन्ह्य़ातील पुरावे शास्त्रीय पद्धतीने गोळा करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) फिरती न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा ही संकल्पना मांडली आहे. त्याअंतर्गत पुणे, मुंबईसह राज्यभरातील दहा पोलीस आयुक्तालये तसेच ३५ पोलीस अधीक्षक कार्यालयांना ४५ अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ बुधवारी झाला.

गंभीर गुन्हा घडल्यानंतर तातडीने घटनास्थळावरून पुरावे गोळा करणे महत्त्वाचे काम असते. रक्त, स्फोटकांचा अंश, शस्त्रांवरील रक्ताचे डाग यासह विविध प्रकारचे पुरावे संकलित करून ते न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्याचे विश्लेषण करून प्रयोगशाळेकडून  पोलिसांना अहवाल पाठविला जातो. बऱ्याचदा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून अहवाल येण्यास वेळ लागतो. त्याचा परिणाम तपासावर होतो. त्यामुळे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने फिरती न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात १० फॉरेन्सिक व्हॅन बुधवारी दाखल झाल्या.

सीआयडीच्या आवारात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात १० व्हॅन सुपूर्द करण्यात आल्या. राज्याचे पोलीस महासंचालक (विधी व तांत्रिक) प्रभात रंजन यांच्या हस्ते व्हॅनचे पूजन करण्यात आले. सीआयडीचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार, संजीवकु मार सिंघल, पोलीस अधीक्षक प्रसाद अक्कानवरू, अंगुली मुद्रा विभागाचे (फिंगर प्रिंट्स) पोलीस अधीक्षक राजेंद्र कुलकर्णी, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे उप संचालक के. व्ही. कुलकर्णी,  पोलीस निरीक्षक पी.एल.अष्टपुत्रे या प्रसंगी उपस्थित होते.

फॉरेन्सिक व्हॅनविषयी माहिती देताना अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार म्हणाले, की पहिल्या टप्प्यात पुणे शहर व ग्रामीण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, नाशिक, सोलापूर, ठाणे ग्रामीण या शहरांसाठी फॉरेन्सिक व्हॅन उपल्बध करून देण्यात येणार आहेत. फिरत्या फॉरेन्सिक लॅबमध्ये अंगुली मुद्रा तज्ज्ञ, छायाचित्रकार, वैज्ञानिक सहायक आणि चालक अशा चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पोलीस अधीक्षक कार्यालयांमधील गुन्हे शाखा आणि पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेला या व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लवकरच मुंबईसह अन्य शहरांमध्ये या व्हॅन दाखल होणार आहेत. अंधारात पुरावे गोळा करताना अडचण आल्यास खास प्रखर प्रकाशझोताची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईत पाच फॉरेन्सिक व्हॅन

मुंबई शहराचा विस्तार पाहता पाच फिरत्या फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांमध्ये अधिकाधिक पुरावे गोळा करण्याचे काम फिरत्या फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून होईल. तसेच घटनास्थळावर सांडलेले रक्त, अन्य पदार्थ, स्फोटकांचे विश्लेषण करण्यासाठी विशेष यंत्रणा व्हॅनमध्ये राहणार आहे.

प्रभात रंजन, पोलीस महासंचालक (विधी व तांत्रिक)