अवघ्या महाराष्ट्रासह छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यातच एक संतापजनक घटना समोर आली असून या किल्ल्यावर काही वन कर्मचारी मद्यपार्टी करताना आढळून आले आहेत. याप्रकरणी मद्यपान केलेल्या पाच कर्मचाऱ्यांना जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवजन्मोत्सवासाठी शनिवारी रात्री किल्ल्यावर आलेल्या सातारा येथील काही शिवप्रेमींना हे कर्मचारी मद्य पिताना आढळून आले. त्यानंतर या तरुणांनी मद्यधुंद अवस्थेतील या कर्मचाऱ्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले. तसेच त्यांना पकडून जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्हिडीओच्या माध्यमांतून पोलिसांनी मद्यपान केलेल्या वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

किल्ल्यावर काही अनुचित प्रकार, मद्यपाणाच्या घटना घडू नयेत यासाठी वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, कुंपनच शेत खात असल्याचे समोर आल्याने सर्वत्र वन कर्मचाऱ्यांवर टीका होत आहे. सध्या या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होईल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.