नाटय़ परिषद पुणे शाखेच्या अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून सध्याच्या कार्यकारिणीतील सुरेश देशमुख आणि अभिनेते अविनाश देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. विद्यमान अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांच्याकडेच पुन्हा धुरा सोपवू नये यावर नवनिर्वाचित सदस्य ठाम असून प्रसंगी संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या रूपाने महिला रंगकर्मीला अध्यक्षपदाचा बहुमान मिळू शकतो.
एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि बनावट मतपत्रिकांचा सुळसुळाट यामुळे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची निवडणूक गाजली. या बाबींना फाटा देत परस्परांमध्ये कटूता येऊ नये या हेतूने पुणे शाखेने सामोपचाराने १५ जागांची बिनविरोध निवड करून नवा पायंडा पाडला. शाखेने निवडणुकीपासून स्वातंत्र्य मिळविले असले तरी, आता खरी लढाई पुढेच आहे. अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हा चर्चेचा विषय झाला असून याविषयी नाटय़वर्तुळामध्ये औत्सुक्य आहे. डॉ. सतीश देसाई हे अध्यक्षपदासाठी उत्सुक असले तरी त्यांना पद देऊ नये या बोलीवरच काही उमेदवारांनी माघार घेत बिनविरोध निवडीचा मार्ग खुला केला आहे.
शाखेच्या १५ सदस्यांची निवड झाली असली तरी पुढील कार्यवाहीसाठी मुंबई येथील मध्यवर्ती शाखेकडून येणाऱ्या आदेशाची वाट पहावी लागणार आहे. निवडणूक झाली असती तर, २९ सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. त्यामुळे सप्टेंबरअखेपर्यंत विद्यमान कार्यकारिणीचे अस्तित्व कायम ठेवायचे की नव्या सदस्यांमधून पदाधिकाऱ्यांची निवड करायची याबाबबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्याकडे केली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.