महापालिका शिक्षण मंडळाकडून शाळांमधील वीजमीटरबाबत अनास्था दाखवली जात असल्यामुळे मंडळाला लाखो रुपयांचा भरुदड दरवर्षी पडत आहे. बंद असलेल्या अनेक शाळांची बिलेही मंडळ भरत असून मीटर नादुरुस्त असल्यामुळे एकेका शाळेचे वीजबिल १० ते ३४ हजारापर्यंत येत आहे. अनास्थेमुळे मंडळाकडून वीजबिलांवर लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च होत असल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
महापालिकेतील आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब जानराव यांनी शुक्रवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. शिक्षण मंडळाच्या १४५ शाळा इमारतींना मीटरद्वारे विजेचा पुरवठा केला जातो. मात्र, त्यातील बहुसंख्य मीटर सदोष आहेत. अनेक मीटर बंद आहेत. तसेच अनेक मीटरवर वीज वापराची नोंद होत नाही. मीटर नादुरुस्त असूनही येणारी सर्व बिले मंडळाकडून कोणतीही शहानिशा न करता भरली जातात. जेथे शाळाच नाही वा ज्या शाळा बंद आहेत, अशाही नावांवर वा पत्त्यांवर बिले येतात आणि अशी बिले भरली जातात, असे डॉ. धेंडे आणि जानराव यांनी सांगितले.
या प्रकारांबाबत मंडळाच्या प्रशासनाकडे आम्ही गेले वर्षभर पाठपुरावा करत आहोत. मात्र, लाखो रुपयांचा भरुदड पडत असूनही मंडळाकडून या प्रकाराबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे डॉ. धेंडे म्हणाले. या प्रकारामुळे दरवर्षी ३० ते ४० लाख रुपयांचा भरुदड मंडळाला पडत असल्याचे आरपीआयने आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मंडळाचा कारभार पाहण्यासाठी पूर्णवेळ शिक्षण प्रमुख नेमण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
वाहतूक शिस्त : एक लाख पुस्तके गोदामातच
शिक्षण मंडळातील पाचवी ते सातवीतील ३७ हजार विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुरक्षा हा विषय गेल्यावर्षी शिकवला जाणार होता. त्यासाठी हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला. तसेच या विषयावर आधारित एक लाख पुस्तकेही मंडळातर्फे छापण्यात आली. प्रत्यक्षात हा विषय विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलाच नाही आणि एक लाख पुस्तके मंडळाच्या गोदामात पडून राहिली. यंदाही हा विषय शिकवण्याचे नियोजन अद्याप झालेले नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचीही तक्रार आरपीआयने केली आहे.