07 March 2021

News Flash

लक्ष्मण माने यांची स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा

माजी आमदार लक्ष्मण माने यांनी ‘समाजवादी रिपब्लिकन पक्ष’ या नवीन राजकीय पक्षाची मंगळवारी घोषणा केली.

| June 25, 2014 03:16 am

बहुजन व उपेक्षित समाजाच्या हातून राजकारण निसटले असून या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत माजी आमदार लक्ष्मण माने यांनी ‘समाजवादी रिपब्लिकन पक्ष’ या नवीन राजकीय पक्षाची मंगळवारी घोषणा केली. हा पक्ष विधानसभा निवडणुकीत उतरणार असून आपण स्वत: मात्र निवडणुकीला उभे राहणार नाही, असे माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘उजव्या प्रतिगामी पक्षांव्यतिरिक्त इतरांनी सन्मानाने चर्चेस बोलावले तर जाऊ,’ असे सूतोवाचही माने यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी हा पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. माने म्हणाले, ‘‘मोदी जेव्हा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसले तेव्हाच वेगळा पक्ष काढण्याचे आम्ही ठरवले. जनतेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार पटला म्हणून त्यांनी मोदींना मतदान केलेले नसून काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी केले आहे. आता पुन्हा मतदान घेतले तर उलटी परिस्थिती दिसेल. सारेच प्रस्थापित पक्ष ‘आहे रे’ वर्गातील असल्यामुळे ते आमचे विरोधक असतील. ज्या गरिबांना राहायला जागा नाही त्यांच्यासाठी आम्ही भूमिमुक्ती आंदोलनाद्वारे सरकारच्या मालकीच्या पडिक जमिनी मागणार आहोत. शिक्षणाच्या खासगीकरणाला आमचा विरोध असून संपूर्ण देशासाठी एकाच शिक्षण मंडळाचे शिक्षण असावे अशी आमची भूमिका आहे.’’
शरद पवार यांच्याशी हातमिळवणी करणार का, या प्रश्नावर माने म्हणाले, ‘‘मी ‘लेफ्ट टू सेंटर’ राजकारण करणारा माणूस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष अशा कुणीही सन्मानाने चर्चेस बोलवले तर मी जाईन. उजव्या प्रतिगाम्यांशी मात्र मी बोलणार नाही.’’
मराठा आरक्षणाबद्दलची आपली भूमिका सांगताना माने म्हणाले की, ‘ज्याचा बाप गरीब आहे अशा प्रत्येकाला आरक्षण द्यायला हवे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, तसेच ब्राह्मण समाजातील गरिबांनाही मिळायला हवे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 3:16 am

Web Title: formation of new party samajvadi republican party by laxman mane
टॅग : Laxman Mane
Next Stories
1 ‘सॅमसंग’कडून पंधरा दिवसांत नुकसान भरपाई मिळालीसुद्धा!
2 पदाधिकाऱ्यांच्या वादग्रस्त जपान दौऱ्याचे असेही फलित
3 ‘स.प.’च्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू
Just Now!
X