भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकर हे करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. भाजपाच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारिणीत योगेश टिळेकर यांना ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे त्यांनी ट्विट  केले आहे.

काल पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली होती. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील. असे महापौर मोहोळ यांनी सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचा देखील काल करोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिल्यांदा करोना विषाणूची सौम्य लक्षण होती. मात्र, त्यांनानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.