सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राज्यसभेचे सदस्य रंजन गोगोई यांनी एका कार्यक्रमात बोलताना धक्कादायक विधान केलं आहे. गोगोई यांनी केलेल्या विधानावर भूमिका मांडताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शंका उपस्थित केली आहे. “त्यांनी या विधानातून न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना?,” असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आहे. माजी सरन्यायाधीशांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना न्यायपालिकेच्या न्यायदानाबद्दल विधानं केलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर प्रसार माध्यमाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेल्या विधानावर आश्चर्य व्यक्त करत शंकाही उपस्थित केली. “राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायाधीश यांनी जे काल विधान केले आहे. ते अंत्यत धक्कादायक आहे. त्यांनी विधानातून न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना?, हे मला ठाऊक नाही. तसेच त्यांनी केलेलं विधान प्रत्येकासाठी चिंता निर्माण करणारं ठरणार आहे. या बद्दल माझ्या मनात शंका नाही,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते माजी सरन्यायाधीश?

गोगोई यांनी त्यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपाचा निवाडा स्वत:च केला होता, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर गोगोई म्हणाले, “मोठ्या कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणं परवडते, इतरांना नाही. जर तुम्ही न्यायालयात गेलात तर तुमचेच मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळत नाही. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही,” असं विधान माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी केलं होतं.