“ज्यांनी आम्हाला विज बिलाचा शॉक दिला आहे. आता त्यांना आम्ही मताच्या रूपाने शॉक देऊ,” अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. तर आरक्षणाच्या मुद्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा प्रचारार्थ ते पुण्यात उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

“राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे म्हणतात की बोगस मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यांनी ज्यावेळी हे विधान केले. यामधून राजकारणातले मोठे अनुभवी आणि हुशार नेते असे विधान करतात. त्यावेळी पुणे मतदारसंघ यांच्याकडून गेला हे समजावे असं मला वाटतं,” अशा शब्दात जयंत पाटील यांच्यावर फडणवीस यांनी निशाणा साधला. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असून संख्येने जरी मूठभर असलो, तरी महाविकास आघाडीला घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले.

“या सरकारने शेतकरी, महिला, रिक्षाचालक, व्यवसायिक यांच्यासह कोणालाही मदत केली नाही. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना अन्न, गॅस, त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे, फुटपाथवरील घटकांना मदत मिळाली पाहिजे या विचारात असायचे आणि त्यांनी मदतदेखील केली आहे. लोकांना कर्मयोगी आवडतात, तेवढे बोलघेवडे आवडत नाही,” असं म्हणत फडणवीस यांनी टीका केली.


प्रचारसभेत सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

दरम्यान, या ठिकाणी आयोजित प्रचारसभेत उमेदवार संग्रामसिंह देशमुख, पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यास जवळपास हजाराहून अधिक नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी करोना महासाथीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांना केराची टोपली दाखविण्यात आली. तर दुसरीकडे याठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचंही पाहायला मिळालं. तर अनेक प्रमुख नेत्यांसह उपस्थित बहुतांश लोकांनी मास्कदेखील घातले नव्हते.