माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डायटिंग चांगलंच मनावर घेतलेलं दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडी जत्रेचं आयोजन केलं आहे. याचं उद्घाटन आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी आपल्याला समोरील कुल्फी, रबडीसारखे स्टॉल खुणावत असल्याचं म्हटलं. परंतु आपण त्या ठिकाणी जाणार नसून आपल्याला डायटिंग करायचं असल्याचं ते म्हणाले.

“आम्हाला व्यासपीठावर बसवून ठेवलं आहे आणि समोर स्पेशल कुल्फी, रबडी अस लिहिलेलं आहे. हे सर्व स्टॉल खुणावत आहेत. मात्र, आज काय त्या स्टॉलकडे जाणार नाही. तसंही त्या स्टॉलकडे तुम्ही (महेश लांडगे) आणि मी जाण योग्य नाही. दोघांनाही डायटिंग करायचं आहे, तुम्ही पैलवान आहात मी नाही. तुमची कमावलेलं शरीर आहे,” असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

महिलांचा विकास आवश्यक
“पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात जोपर्यंत महिला सक्षम होणार नाहीत, तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाकडे आपण जर पाहिले तर त्या देशाने केव्हाच प्रगती साधली आहे. समाजातील दोन्ही चाक जोडली गेली. तेव्हा अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. आर्थिक विकास झाला. त्यामुळे ते देश पुढे गेले. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपला आर्थिक विकासाचा दर आपण दुप्पट करू शकतो. त्यातूनच भारताला प्रगत करू शकतो. महिला सक्षमीकरांकडे लक्ष दिले नाही तर भारत कधीच प्रगती साधू शकणार नाही,” असेही ते म्हणाले.