पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष शरद बोऱ्हाडे यांच्यासह राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भरत लांडगे यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार उपस्थित होते. शरद बोऱ्हाडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून माजी उपमहापौर आहेत. माजी आमदार विलास लांडे यांचे समर्थक म्हणून बोऱ्हाडे ओळखले जातात. तर, भरत लांडगे यांनी यापूर्वी, राष्ट्रवादीच्या तिकिटावर भोसरीतील गवळीनगर प्रभागात लढवली होती. बोऱ्हाडे व लांडगे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला धक्का बसल्याचे मानले जात आहे.