पुरातत्त्वशास्त्र प्राच्यविद्या संशोधक आणि डेक्कन कॉलेजचे माजी संचालक डॉ. मधुकर केशव ऊर्फ म. के. ढवळीकर (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. सिंबायोसिसच्या माजी प्राचार्या डॉ. बीना इनामदार या त्यांच्या कन्या तर, प्रसिद्ध नाटककार शेखर ढवळीकर हे त्यांचे पुत्र होत.

डॉ. ढवळीकर यांचा जन्म १६ मे १९३० रोजी पाटण येथे झाला. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयातून बी. ए. आणि एम. ए. केल्यानंतर त्यांनी पुरातत्त्वशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातून पीएच. डी. संपादन केली. भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्वशास्त्र हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. पुरातत्त्वशास्त्र विभागामध्ये त्यांनी तांत्रिक सहायक म्हणून काम केले. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वशास्त्र विषयाचे त्यांनी नागपूर विद्यापीठात अध्ययन केले. त्यानंतर डेक्कन कॉलेज येथे त्यांनी १९७६ ते १९८२ या कालावधीत प्राध्यापक म्हणून काम केले. सहसंचालक आणि त्यानंतर संचालक म्हणून ते सेवानिवृत्त झाले.

झेड. ए. अन्सारी यांच्या सवमेत त्यांनी उत्खनन कार्यात सहभाग घेतला आणि इसवी सन पूर्व २४०० ते इसवी सन पूर्व २००० या कालावधीवर प्रकाशझोत टाकला. रॉयल एशियाटिक सोसायटी आणि रवींद्रनाथ टागोर शिष्यवृत्तीचे मानकरी ठरलेल्या ढवळीकर यांना २०११ मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची ‘द आर्यन्स : मिथ अँड आर्किओलॉजी’, ‘आर्किओलॉजी ऑफ वेस्टर्न इंडिया’, ‘एन्व्हायर्नमेंट अँड कल्चर : ए हिस्टोरिकल परसेक्टिव्ह’, ‘कल्चरल इम्प्रेरेलिझम : इंड्स सिव्हिलायझेशन इन वेस्टर्न इंडिया’, ‘द फर्स्ट फार्मर्स ऑफ डेक्कन’, ‘इनामगाव येथील उत्खनन’ ‘लेट हिनायनन केव्हज ऑफ वेस्टर्न इंडिया’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘गणेशा : द हिंदू लॉर्ड’ हे वेगवेगळ्या ठिकाणच्या गणपतींवर त्यांनी संशोधनपर लिहिलेले पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले होते.