भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आऱोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि अजून एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हर्षवर्धन जाधव आणि इशा झा या दोघा विरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी चार चाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला.

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत; पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा

त्यावर हर्षवर्धन जाधव आणि इशा झा यांनी अमन चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चड्डा यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचं सांगितलं. मात्र तरीही दोघांनी मारहाण करणं चालूच ठेवलं. यानंतर अमन चड्डा यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली असून बुधवारी सकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार असल्याची माहिती चतुःशृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली आहे.