25 March 2019

News Flash

प्रसारमाध्यमांनी विवेकवाद जपावा- प्रतिभा पाटील

वरिष्ठ सहसंपादक संदीप आचार्य यांना ‘स्व. गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा  ‘स्व. गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार’ ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक संदीप आचार्य यांना रविवारी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

विश्वासार्हता न गमाविण्याबरोबरच भाषा आणि मजकुराचा दर्जा राखण्याचे आव्हान सध्या प्रसारमाध्यमांसमोर आहे. लेखणीचा वापर करताना विवेकवाद जपावा लागणार आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पत्रकारिता साहित्य गौरव पुरस्कारांचे रविवारी प्रतिभा पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक संदीप आचार्य यांना ‘स्व. गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फाउंडेशनचे अध्यक्ष काकासाहेब कायटे, संपादक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे, अध्यक्ष संजय मलमे, कार्याध्यक्ष रमेश खोत, सचिव एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष अनंत पाध्ये, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर यावेळी उपस्थित होते. प्रकाश पोहरे यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रतिभा पाटील म्हणाल्या, प्रसारमाध्यमांचे महत्त्व कायम राहिले आहे. प्रशासन, पोलीस, राज्यकर्त्यांकडून न्याय न मिळाल्यानंतर आजही दुर्बल, गरीब घटक वृत्तपत्रांकडे धाव घेत आहेत. देशातील न्यायाधीशांनाही प्रसारमाध्यमांपुढे जावे लागते, हीच बाब प्रसारमाध्यमांचे महत्त्व सांगणारी आहे. सामाजिक प्रश्न, महिला सक्षमीकरण, व्यसनाधीनता याकडे यापुढील काळात लक्ष द्यावे लागणार आहे.

पुरस्कारार्थीच्या वतीने संदीप आचार्य यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक वानखडे, नीला खोत, दिनेश केळुस्कर, नवनाथ दिघे, राजेश जगताप, शौकतअली मीर यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

 

First Published on April 16, 2018 5:53 am

Web Title: former president pratibha patil given award to sandeep acharya