डॉ. सत्यपाल सिंह यांची पुण्यातील कामगिरीची ओळख कायम

डॉ. सत्यपाल सिंह या नावाचा आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत समावेश झाला असला, तरी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांची ओळख अद्यापही कायम आहे. ‘गुंडांसाठी काठी आणि सज्जनांना फुल’ अशी मात्रा घेऊन सिंह यांनी पोलीस आयुक्तपदाची धुरा हातात घेतल्यानंतर दरारा निर्माण करण्याबरोबच काही बाबींमध्ये ते वादग्रस्तही ठरले. मात्र, आपल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पोलीस दलात निश्चितच छाप उमटवली. त्यामुळेच लोकप्रिय ठरलेल्या सिंह यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने पोलिसांनीदेखील आनंद व्यक्त केला.

पुण्याच्या आयुक्तपदानंतर सिंह यांनी मुंबईचे पोलीस आयुक्तपद भूषविले. त्यानंतर निवृत्ती घेतलेल्या सिंह यांनी आपले मूळ राज्य हरयाणातून खासदारकीची निवडणूक लढविली आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते निवडूनदेखील आले. त्यानंतर अडीच वर्षांनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. मुंबईत जेव्हा टोळीयुद्ध भडकले होते तेव्हा सिंह यांनी गुन्हे शाखेत प्रभावी कामगिरी केली होती. नागपूरचे पोलीस आयुक्तपद भूषविल्यानंतर पुण्यात सन २००८ मध्ये त्यांची पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाली. आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारतानाच ‘गुंडांसाठी काठी आणि सज्जनांना फुलं’ ही त्यांनी केलेली घोषणा लोकप्रिय झाली होती. पुण्यातील टोळीयुद्धाचा बिमोड करण्यासाठी त्यांनी पावले उचलली होती. त्यांच्या काळात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच गुंडांना चकमकीत मारण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातील गुंडगिरीवर त्यांनी जरब बसविली होती.

पुण्याची खास ओळख ठरलेल्या स्कार्फच्या विरोधात सिंह यांनी घेतलेली भूमिका मात्र वादग्रस्त ठरली. दुचाकीस्वार महिलांनी स्कार्फ वापरू नये, असे आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. समस्थ महिलावर्ग आणि माध्यमांनी केलेल्या टीकेनंतर सिंह यांचाही विरोध मावळला. मात्र, गुन्हेगारांविषयी घेतलेली कठोर भूमिका आणि पोलिसांचे मनोबल उंचाविण्यासाठी घेतलेल्या विविध निर्णयामुळे पोलीस दलात सिंह यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. उत्तरेकडील असूनही सिंह यांचे मराठीवर प्रभुत्व आहे. संतसाहित्य आणि गीतेचा त्यांचा गाढा अभ्यास आहे.

गृहराज्यमंत्र्यांविरोधात कठोर भूमिका

आघाडी सरकारच्या काळातील एका गृहराज्यमंत्र्यांशी वाद झाल्याने डॉ. सत्यपाल सिंह चांगलेच चर्चेत आले होते. संबंधित गृहराज्यमंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना संबंधिताकडून पारपत्र मिळविण्यासाठी विविध प्रकारे अटापिटा सुरू होता. त्या प्रकरणात सिंह यांनी कठोर भूमिका घेतल्याने गृहराज्यमंत्र्यालाही पारपत्र मिळविण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांची मुंबई पोलीस दलात पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.