पाच वर्षांत शिवसेना, मनसे, भाजपमार्गे पुन्हा शिवसेनेत

बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

शिवसेनेची पिंपरी-चिंचवड शहरात स्थापना करण्यात गजानन बाबर आघाडीवर होते. शिवसेनेकडून तीन वेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेता, दोनदा आमदार, जिल्हाप्रमुख, किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष, खासदार अशी प्रदीर्घ कारकीर्द असणाऱ्या बाबर यांचा पाच वर्षांत शिवसेना, मनसे, भाजपमार्गे पुन्हा शिवसेना असा प्रवास पूर्ण झाला आहे. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या बाबर यांच्या पुनप्र्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार की पुन्हा जुन्या-नव्याचा संघर्ष सुरू होणार, हे लवकरच दिसून येईल.

कोणताही सारासार विचार न करता केलेल्या एखाद्या कृतीचा नंतरच्या काळात मोठा पश्चात्ताप होतो. रागाच्या भरात झालेली चूक सुधारण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्यात यश येत नाही. त्यातून जिवाची प्रचंड घालमेल होते, असा जो काही अनुभव असतो, तो माजी खासदार गजानन बाबर यांनी घेतला आहे. मावळ लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाल्यानंतर २००९ च्या निवडणुकीत बाबर यांनी ‘मावळ गडा’वर शिवसेनेचा झेंडा फडकावला. मात्र, खासदार असतानाही २०१४ च्या लोकसभेची उमेदवारी त्यांना नाकारण्यात आली. तीव्र नाराज झालेल्या बाबर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. ‘जाता-जाता’ पक्षश्रेष्ठींवर भरपूर तोंडसुख घेतले. गंभीर स्वरूपाचे आरोपही केले. तत्कालीन परिस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप मनसे-शेकाप युतीचे उमेदवार होते. श्रीरंग बारणे यांना विरोध करण्यासाठी त्यांनी जगताप यांना मदत करण्याचे ठरवले. त्यासाठी बाबर यांनी मनसेत प्रवेश केला. मात्र, तेथे त्यांचे वास्तव्य अंशकालीन होते. पुढे बराच काळ बाबर राजकीय प्रवाहापासून दूर फेकले गेले.  िपपरी-चिंचवडचे कार्यक्षेत्र बदलून ते साताऱ्यात सक्रिय झाले. या काळातच त्यांना शिवसेना सोडल्याचा पश्चात्ताप होत होता. बाळासाहेबांचा शिवसैनिक हीच त्यांची खरी ओळख. त्यांचा जो काही उत्कर्ष झाला, तो केवळ शिवसेनेमुळेच झाला आहे. शहरातील त्यांचा दबदबा शिवसेनेमुळे होता. त्यामुळे आपण पुन्हा शिवसेनेत गेले पाहिजे, असे त्यांना राहून-राहून वाटत होते. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खप्पामर्जी झाली होती. बाबरांना पुन्हा पक्षात घेण्यास ते बिलकूल तयार नव्हते.

शिवसेनेत असणाऱ्या त्यांच्या अनेक हितचिंतकांनी प्रयत्न केले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, वैतागून िपपरी महापालिकेच्या निवडणुकांच्या (फेब्रुवारी २०१७) तोंडावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासाठी त्यांना ‘सातारा कनेक्शन’ वापरावे लागले. पालकमंत्री गिरीश बापट आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून महामंडळ किंवा शासकीय पद मिळेल, असे त्यांना वाटत होते. तसे आश्वासनही त्यांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात, त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. माजी खासदार असूनही भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही. पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या बैठका आणि कार्यक्रमांसाठी त्यांना निमंत्रणही दिले जात नव्हते. अशीच परिस्थिती सातारा येथेही त्यांनी अनुभवली. त्यामुळे आपण शिवसेना का सोडली, या पश्चात्तापामध्ये ते होते. योग्य संधीच्या प्रतीक्षेत असतानाच लोकसभा निवडणुकांमुळे बाबर यांच्या इच्छापूर्तीचा मार्ग मोकळा झाला.  बाबरांनी मनापासून मागितलेली माफी तसेच मावळ पट्टय़ातील त्यांची ताकद लक्षात घेत त्यांना पक्षात घेण्यास उद्धव ठाकरे

यांनी मान्यता दिली. अटीतटीच्या मावळच्या लढतीत बाबर यांचा झाला तर उपयोगच होईल, असे गणित मांडण्यात आले असावे. त्यांच्या पुनप्र्रवेशामुळे जुन्या शिवसैनिकांमध्ये समाधान दिसून आले. त्याचवेळी, शिवसेनेतील सध्याच्या कारभारी गटाला बाबर हे भविष्यातील अडथळा वाटू लागल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

सत्ताधारी नेते, महापालिकेची अनास्था

पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या दिवंगत खासदार अण्णासाहेब मगर यांचा शंभरावा जन्मदिन २६ एप्रिल रोजी झाला. मात्र, महापालिका आणि सत्ताधारी नेत्यांची याविषयी अनास्था दिसून आली. सर्वानाच त्याचा विसर पडला. नेते निवडणुकांच्या राजकारणात व्यग्र होते. तर, अधिकाऱ्यांना आचारसंहितेचे आयतेच कारण मिळाले. त्यामुळे ते हात झटकून मोकळे झाले. अण्णासाहेबांच्या प्रयत्नांमुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी या पाच ग्रामपंचायती एकत्र करून नगरपालिका स्थापन झाली. पिंपरी-चिंचवड शहराचे ते नगराध्यक्ष होते. पुढे, पिंपरी-चिंचवडचा समावेश असणाऱ्या हवेली विधानसभेचे ते आमदार झाले. खेड लोकसभेतून ते खासदारही झाले.

उद्योगनगरीचे बस्तान बसत असताना सुरुवातीच्या काळात अण्णासाहेबांनी अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. ती शहरासाठी खऱ्या अर्थाने पायाभरणी होती. अण्णासाहेबांचे शहरासाठी असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आगामी वर्ष अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी वर्ष म्हणून घोषित करावे, अशी मागणी माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी दोन महिन्यांपूर्वीच केली होती. महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी आणि विविध उपक्रमांचे आयोजन करावे, अशी मागणी त्यांनी महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही माहिती देण्यात आली, तेव्हा पक्षीय पातळीवर या उपक्रमात सहभागी होण्याच्या सूचना त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. शहराचा कारभार आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्याकडे आहे. त्यांनी यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी यात स्वारस्य दाखवले नाही. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सर्वपक्षीय पाहुणे असलेल्या प्रवीण तुपे यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनीही फारसा उत्साह दाखवला नाही.