युनेस्कोशी संलग्न संस्थेतर्फे ४ ऑगस्टला पुस्तक प्रकाशन

महाराष्ट्रातील डोंगररांगांमध्ये असलेल्या गडकिल्ल्यांची महती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. युनेस्कोशी संलग्न असलेल्या आयकोफोर्ट इंडिया या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर आधारित ‘स्ट्राँगहोल्ड्स ऑफ वेस्टर्न इंडिया : फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र’ हे इंग्रजी पुस्तक ४ ऑगस्टला प्रकाशित होणार आहे.

आयकोफोर्ट इंडिया या संस्थेच्या संचालिका डॉ. शिखा जैन भारतीय स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत. या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या अर्चना देशमुख यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर आधारित पुस्तकाची कल्पना डॉ. जैन यांच्याकडे मांडली. त्यापूर्वी २०१३मध्ये झालेल्या दुर्ग साहित्य संमेलनात युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा समावेश होण्याबाबत चर्चा झाली होती. २०१४-१५मध्ये त्या बाबत पुण्यात बैठकाही झाल्या. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाचे माजी संचालक राजेंद्र शेंडे आणि खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी डॉ. जैन यांच्याशी संपर्क साधला. डॉ. जैन यांनी गडकिल्ल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून युनेस्कोच्या यादीत गडकिल्ले समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. २०१७मध्ये युनेस्कोच्या समितीने रायगड आणि सिंहगडाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर गडकिल्ल्यांवर आधारित स्वतंत्र पुस्तक तयार करण्याचे काम सुरू झाले. संस्थेने तयार केलेल्या या पुस्तकात राजेंद्र शेंडे, आनंद खर्डे, डॉ. शिखा जैन, अर्चना देशमुख, कोमल पोतदार, डॉ. तेजस गर्गे, मालोजीराव जगदाळे, दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, तेजस्विनी आफळे, कीर्तीदा उन्वाला, सस्मित आचरेकर, डॉ. सचिन जोशी यांचे लेख आहेत. डॉ. जैन आणि रिमा हुजा यांनी संपादन केले आहे.

खासदार छत्रपती संभाजी राजे, युनेस्कोची सल्लागार संस्था ‘इकोमॉस’चे अध्यक्ष डॉ. रोहित जिग्यासू यांच्या हस्ते यांच्या हस्ते ४ ऑगस्टला या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रकाशनानंतर हे पुस्तक युनेस्कोशी संलग्न देश आणि संस्थांना पाठवले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची महती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांना पुस्तक समर्पित

गडकिल्ल्यांच्या अभ्यासामध्ये दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते, गडकिल्ल्यांविषयी विविध अंगाने विपुल लेखनही केले होते. त्यामुळे ही संशोधनपत्रिका मांडे यांना समर्पित करण्यात आली आहे.