दत्तक प्रक्रिया टाळून मूल विकत घेण्याकडे कल

नवजात अर्भकाची तीन लाखांत विक्री करणाऱ्या तीन महिलांसह सासवडमधील निरंकार बालग्राम संस्थेच्या चालकाला पोलिसांनी पकडल्यानंतर पुणे परिसरात आणखी काही नवजात अर्भकांची विक्री झाल्याचा संशय पोलिसांना आहे. शासकीय मान्यता असलेल्या बालसंगोपन केंद्र किंवा अनाथआश्रमातील बालके दत्तक देताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. ही दत्तक प्रक्रिया टाळून मुले विकणाऱ्या टोळ्या पुणे परिसरात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास केला जात आहे.

अर्भकाची विक्री करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दीप्ती संजय खरात (वय ३०, रा. खडकवासला, सिंहगड रस्ता), लतिका सोमनाथ पाटील (वय २३, रा. डोंबिवली, जि. ठाणे), आशा नाना अहिरे (वय २७, रा. उल्हासनगर, जि. ठाणे), केशव शंकर धेंडे (वय ४२, रा. तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी, हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात बाल न्याय अधिनियम सन २०१५ चे कलम ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लतिका ही बारबाला आहे. तिला अनैतिक संबंधातून मुलगा झाला होता. दीप्ती आणि आशा या अनैतिक संबंधातून मातृत्व आलेल्या महिलांच्या संपर्कात असतात. केशव धेंडेचे सासवडमध्ये निरंकार बालग्राम आहे. धेंडेच्या माध्यमातून त्या नवजात बालकांची विक्री करत होत्या. दीप्ती, लतिका, आशा आणि केशव हे नवजात अर्भकाची विक्री करण्यासाठी कसबा पेठेतील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती पोलीस नाईक शंकर कुंभार यांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके, सहाय्यक निरीक्षक महेंद्र जाधव, शंकर कुंभार आणि ज्ञानेश्वर देवकर यांनी सापळा लावून चौघांना पकडले.

पोलिसांनी चौघा आारोपींची कसून चौकशी केली. ज्या व्यक्तीला आरोपी नवजात अर्भकाची विक्री करणार होत्या त्याचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही. तपासात आरोपींनी पोलिसांना फारशी माहिती दिली नाही. यापूर्वी धेंडे याच्या विरुद्ध सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तो चालवत असलेल्या निरंकार बालग्रामची मान्यता रद्द झाल्यानंतर त्याने वसतिगृह सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दत्तक प्रक्रिया टाळून मुलांचा सौदा

ज्यांना अपत्य घ्यायचे असेल अशांना बालसंगोपन केंद्रातून मूल दत्तक घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. अनेकांना ही प्रक्रिया किचकट वाटते. संस्थेत नोंदणी केल्यानंतर दिलेल्या माहितीची शहानिशा केली जाते. त्यानंतर दत्तक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक-दोन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे ही प्रक्रिया टाळून मूल घेण्याकडे काही जणांचा कल असतो. अनैतिक संबंधातून मातृत्व आलेल्या महिला आर्थिक परिस्थितीमुळे मुलांचा सांभाळ करू शकत नाहीत. अशा महिलांच्या संपर्कात मुलांची विक्री करणाऱ्या टोळ्या येतात आणि त्यांना भली मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.