भटक्या कुत्र्यांनी पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात घुसून केलेल्या हल्ल्यात चार काळवीटांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या प्राणीसंग्रहालयात ३४ काळवीट होते, त्यातील चार काळवीटांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने आता काळवीटांची संख्या फक्त ३० राहिली आहे.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या तुटलेल्या भिंतीतून भटक्या कुत्र्यांनी शिरकाव केल्याचा अंदाज आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. प्राणीसंग्रहालयात शिरकाव केल्यानंतर कुत्र्यांनी काळवीटांवर हल्ला केला. मृतांमध्ये दोन नर तर दोन मादी काळवीट आहेत. तर अन्य एक काळवीट जखमी झालंय. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असतो, तर मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे नसतात. ही काळवीट खूप घाबरट असतात. यापूर्वीही भटक्या श्वानांनी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांवर हल्ला केेल्याच्या १५ ते २० घटना घडल्या आहेत.

दरम्यान घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी लगेच त्या कुत्र्यांना बाहेर हाकलून लावलं अशी माहिती प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाय पुणे महानगरपालिकेलाही घटनेचा रिपोर्ट पाठवण्यात आला आहे. चार काळवीटांचा मृत्यू झाल्याने आता प्राणीसंग्रहालयातील काळवीटांची संख्या आता फक्त ३० झाली आहे.

“राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात घुसून केलेल्या हल्ल्यात चार काळवीटांचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक कुत्र्यांनी हल्ला केल्याने, काळवीट सैरभर धाऊ लागले. यामध्ये एकमेकांची धडक झाली. त्यामुळे त्यांचं हृदय बंद पडलं व चौघांचा मृत्यू झाला आहे” : डॉ. सुचित्रा सुर्यवंशी पाटील (पशू वैद्यकीय अधिकारी)