News Flash

चार मगरी मृत्युमुखी, चार चोरीला!

प्राणिसंग्रहालयाची सुरक्षा वाढवण्यात आली असून कुशल कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येत आहे.

आकुर्डी येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातून चार मगरी मरण पावल्याची तर चार पिले चोरीला गेल्याची कबुली पालिकेने दिली आहे.

आकुर्डीच्या सर्पोद्यानातील ढिसाळ कारभार; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून गंभीर दखल

पिंपरी महापालिकेच्या आकुर्डी येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातून चार मगरी मरण पावल्याची तर चार पिले चोरीला गेल्याची कबुली पालिकेने दिली आहे. जवळपास २० सापांचा मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली होती. तेथे पूर्ण वेळ अधिकारी नियुक्त करतानाच आवश्यक बाबींची पूर्तता करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

प्राणिसंग्रहालयातील ढिसाळ कारभारामुळे २०हून अधिक सापांच्या संशयास्पद मृत्यू होण्याचे प्रकरण ताजे असताना याच प्राणिसंग्रहालयातील मगरीची काही पिले आश्चर्यकारकरीत्या गायब झाल्याची माहिती उजेडात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर, पालिका वर्तुळात खळबळ उडाली. या संदर्भात माहिती दडवण्यात येत होती. परस्परविरोधी माहिती पुढे येत असल्याने संशयास्पद वातावरणही होते. तथापि, प्राणिसंग्रहालयाचे अभिरक्षक म्हणून नव्याने नियुक्त केलेल्या दीपक सावंत यांनी प्रसारमाध्यमांना शुक्रवारी याबाबतची ‘वस्तुस्थिती’ सांगितली. ऑक्टोबर २०१६ मध्ये पालिकेकडे १६ मगरी होत्या, अशी नोंद आहे. त्यातील दोन मगरी मोठय़ा होत्या. २३ नोव्हेंबर २०१६ ला मगरीची चार पिले चोरीला गेली. त्या संदर्भात, निगडी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची प्रत प्रशासनाकडे उपलब्ध आहे. एक डिसेंबरला एक, सात डिसेंबरला एक आणि १७ डिसेंबरला दोन अशा चार मगरी मृत्युमुखी पडल्या आहेत. सद्यस्थितीत प्राणिसंग्रहालयात नऊ मगरी आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, याच प्राणिसंग्रहालयात नोव्हेंबर २०१६ मध्ये सापांचे मृत्यूप्रकरण घडल्यानंतर महापालिकेने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर, सावंत यांची पूर्ण वेळ अधिकारी म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात आली. प्राणिसंग्रहालयाची सुरक्षा वाढवण्यात आली असून कुशल कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. दोन महिन्यात प्राणिसंग्रहालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. सापांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर पुढील कार्यवाही होईल, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 2:36 am

Web Title: four crocodile death and four stolen from akurdi zoo
Next Stories
1 पंढरपूरचा स्थापत्त्यशास्त्रीय अभ्यास पूर्णत्वास
2 कोल्हापुरी खाद्यसंस्कृती अनुभवण्याची संधी
3 पर्रिकरांच्या ‘घरवापसी’मुळे संरक्षण खात्याच्या विषयांना खोडा?
Just Now!
X