पुणे : केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार दरवर्षी १५ सप्टेंबपर्यंत धरणे पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असते. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार प्रमुख धरणांपैकी टेमघर तसेच जिल्ह्य़ातील अन्य धरणांपैकी वडिवळे, पिंपळगाव जोगे आणि माणिकडोह ही तीन धरणे अद्यापही १०० टक्के  भरलेली नाहीत. त्यामुळे ही चार धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची अद्यापही प्रतीक्षाच आहे.

केंद्रीय जल आयोगाने धरणे टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार धरणे ३१ जुलैपर्यंत ५० टक्के  भरणे आवश्यक आहेत. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ७७ टक्के , तर १५ सप्टेंबपर्यंत धरणे १०० टक्के  भरणे आवश्यक आहे. या सूचनांनुसार जिल्ह्य़ातील चार धरणे अद्यापही १०० टक्के  भरलेली नाहीत. त्यामध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाचा समावेश आहे. सध्या हे धरण ९८.६४ टक्के  भरले असून या धरणात ३.६६ अब्ज घनफू ट (टीएमसी) भरले आहे. आतापर्यंत म्हणजेच १ जूनपासून टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २७९२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या तुलनेत टेमघर धरण परिसरात सर्वाधिक पाऊस झाला आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित के ले आहे. त्यावर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३२०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर हे धरण १०० भरेल, असा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्य़ातील अन्य धरणांपैकी वडिवळे धरणही अद्याप १०० टक्के  भरू शकलेले नाही. या धरणात सध्या एक टीएमसी म्हणजेच ९३.१२ टक्के  एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यासह पिंपळगाव जोगे आणि माणिकडोह ही धरणे, तर निम्मी देखील भरलेली नाहीत. या दोन्ही धरणांमध्ये अनुक्रमे ४६.६१ टक्के  आणि ४५.६२ टक्के  एवढा पाणीसाठा झाला आहे. ही दोन्ही धरणे अन्य धरणांच्या तुलनेत लहान आहेत. पिंपळगाव जोगे धरणात १.८१ टीएमसी, तर माणिकडोह धरणात ४.६४ टीएमसी पाणीसाठा आहे.

खडकवासला धरणसाखळीत ९९ टक्के  पाणीसाठा

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये २९.१० टीएमसी म्हणजेच ९९.८३ टक्के  पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. गेल्या वर्षी २८ सप्टेंबर रोजी या चारही धरणांमध्ये २९.०१ टीएमसी म्हणजेच ९९.५४ टक्के  पाणीसाठा होता, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.