अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह चार संचालकांचे राजीनामे; गैरव्यवहाराच्या तक्रारींवरून बँकेच्या विरोधात गुन्हे दाखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील अग्रणी सहकारी बँक म्हणून लौकिक असणाऱ्या सेवाविकास सहकारी बँकेत गेल्या काही दिवसांपासून बरीच उलथापालथ सुरू आहे. बँकेतील गैरकारभाराच्या तक्रारींनंतर बँकेचे संचालक, व्यवस्थापकांसह काही जणांवर  फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. या घडामोडी सुरू असतानाच बँकेचे विद्यमान अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह चार संचालकांनी राजीनामे दिल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.

पिंपरी बाजारपेठेच्या केंद्रस्थानी असलेल्या सेवाविकास बँकेच्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात एकूण २५ शाखा आहे. १० हजारांहून अधिक सभासदसंख्या असणाऱ्या या बँकेत ७०० कोटींच्या ठेवी आहेत. अनेक वर्षांपासून बँकेत दोन गट कार्यरत असून त्यांच्यात वर्चस्वावरून कायम संघर्ष सुरू आहे. बँकेच्या कारभारातील अनियमितपणा, कर्ज मंजूर करताना खोटय़ा सह्य़ा व बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. त्यानंतर बऱ्याच घडामोडी होत गेल्या, त्यातून संचालकांचे राजीनामा नाटय़ घडले आहे. बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी, संचालक चंद्रशेखर अहिरराव, राजेश सावंत आणि सुनील डोंगरे यांनी वैयक्तिक तसेच प्रकृतीचे कारण पुढे करून राजीनामे दिले आहेत. बँकेविरोधात हिंजवडी आणि पिंपरी अशा दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात  आले आहेत. हिंजवडीतील प्रकरणात कर्ज नामंजूर झालेल्या एका नागरिकाच्या कागदपत्राचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीला दीड कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे हप्ते थकल्यानंतर बँकेचे वसुलीपथक पहिल्या व्यक्तीकडे गेले. त्यामुळे हा कर्जघोटाळा उघड झाला. दुसऱ्या प्रकरणात, मोशीत बेकायदेशीर इमारतीतील सदनिकांना कर्ज मंजूर करण्यात आले. तसेच एकीकडील कागदपत्रांचा इतरत्र वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. काही संचालकांनी अटकपूर्व जामीन मिळवला आहे. तर, इतर संचालक त्या प्रयत्नात आहेत. अशाचप्रकारे आणखी काही संशयास्पद प्रकरणांत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

दिग्गजांची मध्यस्थी अन् राजीनाम्याचा तोडगा

बँकेतील अंतर्गत गैरव्यवहारांचे हे प्रकरण वाढू नये, यासाठी अध्यक्ष अमर मूलचंदाणी व त्यांच्या समर्थक संचालकांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. शहराच्या राजकारणातील दिग्गजांनी दोन्ही गटांत मध्यस्थी केली. त्यातून अध्यक्ष व इतर तीन संचालकांनी राजीनामे द्यावेत, असा तोडगा काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.

पिंपरीतील फसवणुकीच्या गुन्ह्य़ाप्रकरणी सेवाविकास बँकेच्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. इतर नऊ आरोपींना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पुढील तपास सुरू आहे.

– वसंत बाबर, पोलीस निरीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा)