सहलीसाठी निघालेल्या आणि गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चौघा जणांपैकी एकाचा मृतदेह पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळजवळच्या नीरा नदीच्या पात्रात बुधवारी सापडला. या मृतदेहाची ओळख पटली असून, चिंतन बूच (वय २८) असे त्याचे नाव असल्याचे पोलीसांनी सांगितले. नीरा नदीच्या पात्रात उर्वरित मृतदेह आणि चारचाकी गाडीचा शोध घेण्यात येतो आहे.
कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघालेल्या पुण्यातील एका जाहिरात कंपनीतील चार जण गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असल्याचे उघडकीस आले होते. यामध्ये एका युवतीचाही समावेश आहे. या चौघांचेही शेवटचे लोकेशन सातारा रस्त्यावरील कापूरहोळ असे स्पष्ट झाले होते. सर्वाचे मोबाइल संच ‘स्वीच ऑफ’ झाल्याने या प्रकरणातील गूढ वाढले होते. सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.
प्रणव अशोक लेले (वय २९, रा. श्रमिक बंगला, कमलेश सोसायटी, कोथरूड / अर्जुन रेखा अपार्टमेंट, बाणेर), चिंतन बूच आणि साहिल कुरेशी (दोघेही रा. अर्जुनरेखा अपार्टमेंट, बाणेर) आणि श्रुतिका चंदवाणी (रा. महर्षिनगर) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. अशोक वासुदेव लेले (वय ४७, रा. कमलेश सोसायटी, कोथरूड) यांनी यासंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या पैकी चिंतन बूच याचा मृतदेह सापडला.
प्रणव लेले, चिंतन बूच, साहिल कुरेशी आणि श्रुतिका चंदवाणी हे एका जाहिरात कंपनीमध्ये कामाला आहेत. या कंपनीमध्ये प्रणव हा भागीदार आहे. शुक्रवारी (१ नोव्हेंबर) कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर येथे सहलीला जात असल्याचे सांगून चौघे जण बाहेर पडले. श्रुतिका ही मूळची कोल्हापूर येथील आहे. त्यामुळे तिला कोल्हापूर येथे सोडून हे तिघे पुढील प्रवासाला जाणार होते. ठरलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रणव घरातून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशीपासूनच या चौघांचेही मोबाइल संच स्वीच ऑफ झाले. त्यामुळे मुलाचा ठावठिकाणा लागत नसल्याने अशोक लेले यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
(सोबतचे छायाचित्र – चिंतन बूच)