पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे बुधवारी उशिरा रात्री ट्रक आणि खासगी कंपनीची बस यांच्यातील अपघातात चार जण जागीच ठार झाले असून पाच जण जखमी झाले  आहेत.

राकेश रामानंद पाटील (वय-२८, रा. लातूर), नरसिंग तुकाराम सोळुंके (वय-२३, रा. बुलढाणा), नीरजकुमार बाणेश्वर सिंग (वय-२८, रा. कृष्णानगर) अशी तीन मयतांची नावे आहेत.  चौथ्याची ओळख पटवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. याशिवाय, अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे व अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर नागरिकांनी जखमींना रूग्णालयात उपचारासाठी नेले.  यासंदर्भात, फौजदार महेश मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले की, खासगी कंपनीच्या बसमध्ये जवळपास १८ प्रवासी होते. एकेका कर्मचाऱ्याला सोडत ती बस पुढे जात होती. चाकणजवळ बालाजीनगर येथे बस थांब्यावर थांबलेली असताना मागाहून वेगाने आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे बस जवळच्या खड्डय़ात कोसळली. या अपघातात चार जण ठार झाले आहेत. त्यापैकी तीन जण कंपनीचे कामगार आहेत, तर चौथ्याची ओळख पटलेली नाही. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.