विवाह समारंभ संपवून मुंबईला निघालेल्या स्कॉर्पिओ मोटारीची ट्रकला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून चौघांची प्रकृती गंभीर आहे.  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पवना पोलीस चौकीजवळ शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमासार हा अपघात झाला.
कासीम काझीर पटेल (वय ७६), हमीदाबी कासीम पटेल (वय ६४), परवीन मुजम्मीन पटेल (वय ३५), इरफान अहमद बिरादार (वय १२ रा. कळंबोली, नवी मुंबई, मूळ-आनंदवाडी, ता, निलंगा, लातूर) अशी मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत. अजहर मुजमिल बिरादार (१२), जफर मुजमिल बिरादार (१८), समरिन मुजमिल बिरादार (१५), अहमद राजासाहब बिरादार (३५), रियान अहमद बिरादार (९), शोएब अहमद बिरादार (६), शकिल तुराब बिरादार (२४) व बिलकिस अहमद बिरादार (३२, सर्व राहणार कळंबोली, नवी मुंबई, मूळचे राहणार आनंदवाडी, निलंगा, लातूर)  हे जखमी झाले आहेत. यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल, बिरादार कुटुंबीय मूळचे लातूर जिल्ह्य़ातील राहणारे आहेत. ते कामाच्या निमित्ताने नवी मुंबई येथे राहण्यास आहे. काही दिवसांपूर्वी हे सर्वजण मूळगावी एका विवाह समारंभाला गेले होते. शुक्रवारी रात्री ते स्कॉर्पिओ मोटारीतून मुंबईला निघाले होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बऊर गावाच्या हद्दीत शनिवारी पहाटे मोटार चालकाला समोर असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्यामुळे मोटार ट्रकवर पाठीमागून आदळली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला व एक लहान मुलाचा समावेश आहे. तर, जखमींमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर असून जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.