महापालिकेची आगामी निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून एका प्रभागातून चार सदस्य निवडून द्यायचे आहेत. या रचनेला मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजुरी दिल्यामुळे आता किती सदस्यांचा प्रभाग याबाबतची संदिग्धता संपली असून निवडणुकीतील प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा पुण्यात कोणत्या पक्षाला होणार आणि प्रभाग रचना कशी होणार याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळात आहे.
राज्यातील सोळा महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असून त्या सध्याच्या दोन सदस्यांच्या प्रभागानुसार होणार का चार सदस्यांच्या प्रभागानुसार होणार का पुन्हा एकसदस्यीय प्रभाग रचना होणार याबाबत शासनाचा अंतिम निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही प्रभागांबाबत अनेक महिने चर्चा सुरू होती. मुंबई वगळता राज्यातील अन्य महापालिकांमध्ये चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे राजकीय पक्षांना त्यांची व्यूहरचना आखणे यापुढे शक्य होणार आहे. प्रभाग चार सदस्यांचा होणार असल्यामुळे या निर्णयाचा फायदा कोणत्या पक्षाला पुण्यात होणार याचीच चर्चा आजपासून जोरात सुरू झाली आहे.
महापालिकांची निवडणूक किती सदस्यांच्या प्रभागानुसार घ्यायची याचा निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाने नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची समिती नेमली होती. या समितीने आमदार संभाजी पाटील, पुण्याचे नगरसेवक अशोक येनपुरे आणि आणखी दोन लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली चार सदस्यांची एक उपसमिती नियुक्त केली होती. या समितीने चार सदस्यांच्या प्रभागाला अनुकूलता दर्शवत तसा अहवाल बापट, पाटील आणि महाजन यांच्या समितीला सुपूर्द केला होता. त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीने महापालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे.