05 March 2021

News Flash

लांबलेल्या पावसाने पुण्याला चार महिन्यांचे अतिरिक्त पाणी

यंदाच्या हंगामात जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कोसळलेल्या पावसाची स्थिती सरासरीच्या तुलनेत निराशाजनक होती.

(संग्रहित छायाचित्र)

 

धरण क्षेत्रात अवकाळी पावसाचा ‘बोनस’; गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच अब्ज घनफुटाहून अधिक साठा

मोसमी पाऊस परतल्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या मालिकेमुळे राज्यात अवकाळी पाऊस लांबला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. परिणामी पुणे शहराला चार महिने पुरेल इतका अतिरिक्त पाणीसाठा धरणांत जमा झाला आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात धरणांत पाच अब्ज घनफुटाहून (टीएमसी) अधिक पाणीसाठा आहे.

यंदाच्या हंगामात जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कोसळलेल्या पावसाची स्थिती सरासरीच्या तुलनेत निराशाजनक होती. सुरुवातीला पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे पडला होता. मात्र, २६ आणि २७ जूनला मोसमी पाऊस जोरदार बरसला. या दोन दिवसांमध्ये धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणीसाठा जमा झाला. १ जूनपासून २५ जूनपर्यंत पाऊस सरासरीत मागे पडला होता. मात्र, ३० जूनपर्यंत परिस्थिती पूर्णपणे बदलली. जुलैच्या पहिल्या आठवडय़ातही चांगल्या पावसाची नोंद झाली. जुलैच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाच ते सहा दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर कायम होता. या काळात धरणांतून विसर्गही करण्यात आला. तांत्रिकदृष्टय़ा ३० सप्टेंबरला मोसमी पावसाचा हंगाम संपताना खडकवासला धरण साखळीमध्ये काठोकाठ पाणीसाठा होता.

गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला होता. यंदा ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अवकाळी पाऊस बरसला. परिणामी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडून आणि कालव्यातून विसर्ग करूनही पाणीसाठा कमी होऊ शकला नाही. गेल्या वर्षी ११ नोव्हेंबरला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरण साखळीमध्ये मिळून २३.०२ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा तो २८ टीएमसी आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. पुण्याला चार महिने पुरेल इतका अतिरिक्त पाणीसाठा सध्या धरणांत आहे.

शहरात ३३० मिलिमीटर अवकाळी

धरण क्षेत्रासह पुणे शहर आणि परिसरातही हंगामानंतर मोठय़ा प्रमाणावर पाऊस बरसला. हंगामात १००० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे यंदा पावसाचा विक्रम झाला. मात्र, त्यानंतरही पाऊस सुरूच राहिल्याने तो शहरातील नागरिकांसाठी विक्रमाकडून वैतागाकडे गेला. हंगाम संपल्यानंतर शहरात आजवर एकूण ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हंगामानंतरचा हा पाऊस सरासरीच्या तुलनेत तब्बल २३४ मिलिमीटरने अधिक आहे.

धरणांतील पाणीसाठा

  •  वरसगाव १२.८२ टीएमसी (१०० टक्के)
  •   पानशेत १०.६५ टीएमसी (१०० टक्के)
  •  खडकवासला १.८४ टीएमसी (९३.३१ टक्के)
  •  टेमघर २.७३ टीएमसी (७३.५८ टक्के)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:10 am

Web Title: four months additional water prolonged rainfall akp 94
Next Stories
1 ”दगडफेक करणाऱ्या तरुणाला आता रोजगाराची आशा”
2 पिंपरी-चिंचवड : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून ११ लाख लंपास
3 “तुमच्या हाताला मुंग्या चावल्या का?”; राज ठाकरेंना तिने प्रश्न विचारला अन्…
Just Now!
X