पिंपरी-चिंचवड शहरात  आणखी चार जणांना करोना विषाणूची बाधा झाली असून यामध्ये एका चार वर्षीय चिमुकलीसह गर्भवती महिलेचाही समावेश आहे. याचबरोबर शहरातील  करोना बाधितांची एकुण संख्या ४५ झाली आहे.

इतर तीन जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, १२ जणांना करोनामुक्त करण्यात आलं असून ३३ जणांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. आज देखील शहरात चार जण करोना बाधित असल्याचे आढळले असून यात ४ वर्षीय चिमुकली आणि एका गर्भवती महिलेचा समावेश असल्याची गंभीर बाब समोर आली आहे . या दोघींवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित महिलसेह अन्य जणांना परिसरातील करोनाबाधित व्यक्तीमुळे करोनाची बाधा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. हे सर्व बाधित खराळवाडी आणि भोसरी परिसरातील आहेत. या ठिकाणचे काही भाग   या अगोदरच  पोलिसांकडून सील करण्यात आले आहेत. मात्र, सर्व नागरिकांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर   योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.