|| चिन्मय पाटणकर

महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी आणि आघारकर संस्थेचे संशोधन

पुणे : द्राक्षापासून तयार होणाऱ्या वाइनचे उत्पादन चार पटींनी वाढवण्याची नवी पद्धत विकसित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी आणि आघारकर संस्थेतील संशोधकांनी वाइन तयार करण्यासाठी ही नवी अत्यंत उपयुक्त पद्धत विकसित केली आहे.

सध्याच्या वाइननिर्मितीच्या प्रचलित पद्धतीमध्ये दोन किलो द्राक्षांतून अंदाजे एक लिटर वाइन तयार होते. नव्या पद्धतीमुळे एक किलो द्राक्षांद्वारे अंदाजे दोन लिटर वाइन तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे वाइनचे उत्पादन वाढवणे शक्य होणार आहे. या तंत्राचे स्वामित्व हक्क मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. या पद्धतीने वाइननिर्मितीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळवता येऊ शकेल, अशी माहिती महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीचे संशोधक अरविंद किलरेस्कर यांनी दिली. या संशोधनामध्ये आघारकर संशोधन संस्थेतील डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. सुजाता तेताली, प्रवीण क्षीरसागर यांचाही सहभाग आहे.

कमी द्राक्षांसाठी (किलो) आणि जास्त द्राक्षांसाठी (टन) दोन स्वतंत्र पद्धती आहेत. घरगुती स्वरूपात किंवा वाइन प्लँटद्वारेही वाइन तयार करता येऊ शकते. त्यामुळे शेतकरी त्यांच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करू शकतात. नव्या पद्धतीमध्ये वाइन तयार करण्यासाठी प्रामुख्याने द्राक्षांचा वापर करण्यात आला. मात्र, अन्य फळांचा वापर करूनही वाइननिर्मिती करता येऊ शकते, असेही किलरेस्कर यांनी सांगितले.

नवी पद्धत कशी?

सध्या दोन किलो द्राक्षांतून अंदाजे एक लिटर वाइन तयार होते. वाइन तयार करण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेमध्ये द्राक्षे काही काळ किण्वनासाठी ठेवली जातात. मात्र, महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी आणि आघारकर संशोधन संस्थेने संशोधन करून विशिष्ट प्रकारचे द्रव्य तयार केले आहे. जे किण्वनासाठी ठेवलेल्या द्राक्षांमध्ये मिसळले जाते. त्यामुळे वाइनचे उत्पादन वाढवणे शक्य होणार आहे. वाया गेलेली द्राक्षे, बिया असलेली द्राक्षे, द्राक्षांचे देठ यांचाही वापर नव्या पद्धतीमध्ये करता येईल.

वाइननिर्मितीच्या नव्या पद्धतीला अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळवता येऊ शकेल. – डॉ. प्रशांत ढाकेफालकर, संचालक, आघारकर संशोधन संस्था